Sangli suicide: महाराष्ट्राला हादरवणाऱ्या 9 आत्महत्या..म्हैसाळ गाव शोकमग्न, ‘योग’ बंगल्यापुढे तोबा गर्दी, सुन्न करणारा ग्राऊंड रिपोर्ट

महाराष्ट्राला हादरवणारी घटना आज सांगली जिल्ह्यात घडली. म्हैसाळ्यात एकाच कुटुंबातील 9 जणांनी वेगवेगळ्या घरात आत्महत्या केली. दोन सख्ख्या भावांची ही कुटुंबे होती. दोन्ही कुटुंबे उच्चशिक्षित होती. यानंतर म्हैसाळा गावावर शोककळा पसरली. या घटनेचा आढावा घेणारा हा ग्राऊंड रिपोर्ट

Sangli suicide: महाराष्ट्राला हादरवणाऱ्या 9 आत्महत्या..म्हैसाळ गाव शोकमग्न, योग बंगल्यापुढे तोबा गर्दी, सुन्न करणारा ग्राऊंड रिपोर्ट
Sangli suicide ground report
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jun 20, 2022 | 7:15 PM

सांगली – म्हैसाळकारांचा सोमवारचा दिवस उजाडला तोच एका हादरवणाऱ्या बातमीनं.. गावात परिचित असलेल्या दोन भावांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती काही क्षणांत गावातल्या घराघरात पोहोचली आणि गाव शोकमग्न झालं. गावात डॉक्टर असलेल्या माणिक वनमोरे यांनी नुकताच राजधानी हॉटेलजवळ बंगला बांधलेला होता. बंगल्याचे नाव होते योग. पशु वैद्यकीय डॉक्टर असलेले डॉ. माणिक यांच्या या बंगल्यापुढे सारं गाव जमा झालं..

डॉ. माणिक यांचा बंगला, सहा मृतदेह या ठिकाणी सापडले

पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. गर्दी हटवण्यासाठी बॅरिकेटिंग करण्याची वेळ पोलिसांवर आली, एवढी गर्दी घराबाहेर जमा झाली होती.

डॉ. माणिक यांच्या बंगल्याबाहेर पोलिसांची रीघ

डॉ माणिक यल्लप्पा वनमोरे यांच्या बंगल्यात डॉ. माणिक, पत्नी रेखा, आई आकताई यल्लप्पा वनमोरे, मुलगी प्रतिमा ,मुलगा आदित्य आणि पुतण्या शुभम यांचे असे सहा मृतदेह सापडलेत. सामूहिक आत्महत्येच्या वेळी त्यांचा पुतण्या त्याच्या स्वताच्या वडिलांच्या घरात न राहता, काकाच्या घरी मुक्कामाला होता.

डॉ. माणिक यांचा पत्नीसह जुना फोटो

घराबाहेर आक्रोश करणाऱ्या महिला दिसत होत्या. सगळं वातावरम सुन्न करणारं असंच होतं. डॉ. माणिक यांच्या आईही आत्महत्या केली त्यावेळी त्यांच्याच घरात होत्या.

योग बंगल्याबाहेर महिलांचा आक्रोश

योग बंगल्यात राहणारे माणिक यांची स्थिती त्यांच्या शिक्षक भावापेक्षा जरा बरी असावी. घरात निरनिराळ्या खोल्यात काही मृतदेह सापडले. हॉलमध्ये कुलरच्या समोर असलला डॉ. माणिक यांचा मृतदेह पोलिसांना सापडला.

डॉ. माणिक यांच्या घरातील कूलर

तर दुसरा भाऊ पोपट वनमोरे हे पेशाने शिक्षक होते. पोपट यांचे घर अंबिका नगर, नरवाड रोड, चौंडजे मळा येथे होते. त्यांच्या घरात पोपट वनमोरे, त्यांची पत्नी संगीता, मुलगी अर्चना असे तीन मृतदेह सापडले आहेत. घरातल्या एका छोट्या खोलीत हे तिन्ही मृतदेह सापडले आहेत. त्यातली काही दृष्ये किंवा फोटो पाहण्यासारखीही नव्हती.

नऊ मृतांपैकी आठ जणांचे फोटो

एका हसत्या खेळत्या कुटुंबाची एका रात्रीतून अखेर झाली. सुशिक्षित असलेल आई वडील, उच्चशिक्षित तरुण मुले मुली या सगळ्यांचा शेवट झाला. आता डॉ. माणिक यांचे घर पुन्हा कोण उघडेल हे माहित नाही. या कुटुंबाने कष्टाने उभे केलेले हे जग कायमचे संपवण्याचा विचार त्यांनी का करावा, यामागे काय योग असावा, हे कोडं बरेच दिवस कोडचं राहील, असे दिसते आहे.

डॉ. माणिक यांच्या घराचा दरवाजा आणि नेमप्लेट