Abhijeet Dipke : …म्हणून काँग्रेस नेत्याच्या आश्रमशाळेत गेले नाहीत; भाजप मंत्र्यांचा अभिजीत दिपकेंना टोला
अभिजीत दिपके आदिवासी शाळांची पाहणी करत आहेत. या दौऱ्यावरून मंत्री अशोक उइके यांनी अभिजीत दिपकेंना टोला लगावला आहे.

सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके हे राज्यातील विविध आदिवासी शाळांना भेटी देत आहेत. त्यांनी मागील काही दिवसांत अनेक आदिवासी शाळांमधील सुविधांची पोलखोल केली आहे. आदिवासी शाळांच्या दुरावस्थेवरून अभिजीत दिपके यांच्याकडून सरकारवर टीका केली जात आहे. परंतु ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ मोहीमेदरम्यान अभिजीत दिपके यांनी गडचिरोलीत एका आश्रमशाळेची पाहणी केली नाही. या आश्रमशाळेत तीन आदिवासी विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता. परंतु या आश्रमशाळेला भेट न दिल्याने आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी अभिजीत दिपके यांनाच टोला लगावला आहे. ती शाळा कॅाग्रेस पदाधिकाऱ्याची होती म्हणून अभिजित दिपके गेले नाही का? असा सवाल उइके यांनी केला.
अभिजीत दिपके यांच्या दौऱ्यानंतर आदिवासी विकास विभाग ॲक्शन मोडवर आलं आहे. एका महिन्यात राज्यातील पाच लाख विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणार आहे. आदिवासी आश्रमशाळेत आणि खासगी शाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. १७ सप्टेंबर ते १७ ॲाक्टोबर या काळात सेवा सप्ताह आणि आरोग्य तपासणी केली जाईल. तर त्या आश्रमशाळेला भेट न देण्यावरून दिपकेंना टोला लगावताना मंत्री उइके म्हणाले, ‘ अभिजित दिपके गडचिरोली येथे गेले होते, मला वाटलं ते जपतलाई येथे सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या मुलींच्या शाळेला भेट देतील. तिथल्या अव्यवस्थेची पाहणी करतील. पण ते तिथे गेले नाही. काँग्रेस पदाधिकाऱ्याची आश्रमशाळा असल्याने अभिजित दिपके गेले नाही का? असा सवाल उइके यांनी उपस्थित केला.
‘अभिजित दिपके जपतलाई येथे गेले असते, ती शाळा कुणाची आहे? १९९२ पासून त्या शाळेत सुविधा का नाही. याची पाहणी दिपके यांनी केली असती, त्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा केली असती. पण ते गेले नाही. अभिजित दिपके यांनी आश्रमशाळेत दौरा करावा, पाहणी करावी करावी. ५५८ आश्रमशाळेवर आम्ही थर्ड पार्टी ॲाडिट लावलं आहे. आता त्यावर कारवाई करणार आहे, असे ते पुढे म्हणाले.
उइके पुढे म्हणाले, मुख्यमंत्री यांनी एक चांगला निर्णय घेतला होता. आदिवासी विद्यार्थी इंग्रजी माध्यमात. सीबीएसईचं नामांकीत शाळेत शिक्षण मिळावं म्हणून आणखी योजना आहेत. आता इंग्रजी शाळांचं ग्रेडेशन सुरु आहे. त्या शाळेत सुविधा नसेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. ए, बी, सी ग्रेड… सुविधेनुसार ग्रेड दिलेय. ज्यांच्याकडे सुविधा नाही. त्या शाळेवर कारवाई होईल. चंद्रपुरातील दुष्काळावर उइके म्हणाले, ‘चंद्रपूर जिल्हा येथील दुष्काळाची पाहणी केली. मुख्यमंत्री लवकरच शेतकरी केंद्रबिंदू ठेवून मदतीची घोषणा करणार आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळाचा अहवाल मिळेल’.
