
मागच्या काही काळापासून वैभव खेडेकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये नाराज होते. अखेर काही दिवसांपूर्वी ते मनसेमधून बाहेर निघणार हे स्पष्ट झालं. वैभव खेडेकर हे कोकणातील मनसेचे मोठे नेते म्हणून ओळखले जायचे. खेडमध्ये मनसेचा विस्तार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पक्षाच्या स्थापनेपासून त्यांनी राज ठाकरे यांना साथ दिली. पण मागच्या काही महिन्यांपासून मनसेमधील त्यांची नाराजी लपून राहिली नव्हती. काही दिवसांपूर्वी मनसेमधून बडतर्फ करण्यात आल्याच पत्र वैभव खेडेकर यांच्या हाती पडलं. वैभव खेडेकर आता भाजपध्ये प्रवेश करणार आहेत. या संदर्भात राज्य सरकारमधील मंत्री आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी माहिती दिली.
“वैभव खेडेकर यांना मी यापूर्वी ओळखत होतो. गावागावात मनसे पोचवण्याचे काम त्यांनी केलं. पण त्यांच्या हातात अचानक मनसेमधून बडतर्फ करण्यात पत्र त्यांना पाठवण्यात आलं. वैभव खेडेकर यांना भाजपची ऑफर दिली होती. प्रदेशाध्यक्षांचा संदेश घेऊन वैभव खेडेकरांना भेटायला आलोय” असं नितेश राणे म्हणाले. 4 सप्टेंबरला रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वैभव खेडेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होणार आहे असं नितेश राणे म्हणाले. ‘वैभव खेडेकर यांना ताकद देणार, जबाबदारी देणार’ असं नितेश राणे यांनी सांगितलं.
जरांगें पाटील यांच्या आंदोलनावर काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनावरही नितेश राणे बोलले. ” जरांगे आंदोलनावर बोलण्याचा सुप्रिया ताई सुळे यांना नैतीक अधिकार नाही” असं नितेश राणे म्हणाले. “मी हिंदुत्वाचं काम करतो. जिहाद मानसिकतेचे लोक जरांगे यांच्या व्यासपीठावर कसे बसतात?” असा सवाल नितेश राणे यांनी केला.
‘राज ठाकरेंनी त्यांच्या हृदयातून मला बाजूला केलं’
“भारतीय जनता पार्टी ताकद देणार आहे. राज ठाकरेंसाठी माझ्या हृदयातला कोपरा आजही ओला आहे. मी राज ठाकरेंच्या हृदयातून नाही तर राज ठाकरेंनी त्यांच्या हृदयातून मला बाजूला केलं. माझ्यासोबत माझ्या सर्व समर्थकांची मला साथ आहे. यापुढेही भाजपचं काम तेवढ्याच ताकदीने केलं जाईल” असं वैभव खेडेकर म्हणाले.