‘त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये…’, एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याला भाजप नेत्याचा टोला

शिवसेनेचे पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातील मंत्र्याला भाजपा नेत्याने टोला लगावला आहे. या नेत्याने नुकतच मला संधी मिळाली, तर मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन, असं म्हटलं होतं.

त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये..., एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याला भाजप नेत्याचा टोला
sanjay raut
| Updated on: Feb 02, 2025 | 11:47 AM

राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे हे चंद्रपूरमध्ये धर्म सभेसाठी आले आहेत. त्यांना एकनाथ शिंदे यांची अस्वस्थतता तसच मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानाबद्दल प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडली. शिवसेना आमदार आणि मंत्री संजय शिरसाट बोलले की, मला संधी मिळाली, तर मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन, यावर नितेश राणे यांनी उत्तर दिलं. “हो ठीक आहे, तसे प्रयत्न करत रहावेत. पण त्या बद्दल एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांच काय मत आहे, याबद्दल त्यांनी विचार करावा. संजय शिरसाट आमचे मित्र आहेत. फक्त त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये एवढीच अपेक्षा आहे” असं नितेश राणे म्हणाले.

एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत का? या प्रश्नावर नितेश राणे म्हणाले की, “कोणी अस्वस्थ नाही. सगळे खुश आहेत. शिंदेसाहेब, अजितदादा, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आपआपल्या खात्याच काम संभाळतोय. आम्हाला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचं आहे. विरोधकांकडे काही काम राहिलेलं नाही. ते बरोजगार झाले आहेत. म्हणून त्यांनी बेरोजगार संस्थेत नोंदणी करावी. आमचं सरकार त्यांना काहीतरी काम देईल”

ते काँग्रेसच मुखपत्र झालय

सामनातून गौप्यस्फोट करण्यात आलाय. त्यावर नितेश राणे म्हणाले की, “सामना आता कोण वाचत नाही. शिवसैनिकांनी सुद्धा वाचणं बंद केलाय. कारण ते काँग्रेसच मुखपत्र झालय. वाचण्यापेक्षा पुसण्यासाठी सामना जास्त उपयोगाचा आहे”

बिघडलोय कुठे सुधरायला?

विरोधी पक्षाने टिप्पणी केली आहे की, तुम्ही मंत्रीपदावर आहात, तर तुम्ही सुधरलं पाहिजे. “कशासाठी सुधरु. बिघडलोय कुठे सुधरायला? धर्माबद्दल बोलणारे कधी बिघडत नाहीत. आम्ही सुधारलेले आहोत. जे बिघडलेले लोक आहेत. ज्यांना आपला धर्म आणि इस्लाम समजलेला नाही, कुराणमध्ये काय लिहिलय ते समजलं नाही, त्यांची सुधारण्याची वेळ आली आहे” असं नितेश राणे म्हणाले.