
पुणे – मला पीएचडी मिळावी अशी खूप इच्छा होती आणि त्याच वेळेस मला पीएचडी मिळाली आहे. सामाजिक क्षेत्रात मला पीएचडी मिळाली आहे यासाठी डी.वाय.पाटील विद्यापीठाचे आभार अशी प्रतिक्रीया मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. अनेक लोकांना त्यांनी डॉक्टरेट दिली आहे, जसं की आपला सर्वांचा लाडका क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि अनेक विद्यमान,गुणवानांना ही पदवी मिळाली आहे, माझंही भाग्य मलाही त्यांनी पीएचडी दिली आहे असे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
यावेळी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी मराठीत बोलु का.? मातृभाषा का राष्ट्रभाषा ? ज्यांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांची भाषा.कुठल्या भाषेत बोलू चला मी खिचडीत बोलते. मला पीएचडीची खूप इच्छा होती आणि त्याच वेळेस मला पीएचडी मिळाली आहे.सामाजिक क्षेत्रात मला पीएचडी मिळाली आहे. त्या पुढे म्हणाल्या की,’ जे तुम्हाला बनायचं ते बना. पण लोकांनी जसं तुम्हाला ट्रीट करावं वाटतं, तसं तुम्ही बना.पैसे कमवल्याने आपला इगो सॅटिस्फाय होतो. पण आनंद व्यक्ती बना.आनंदी व्यक्ती बनवायचं असेल आणि आनंदी करायचं असेल तर पॉझिटिव्ह राहायला शिका.ऐकावे जनाचे करावे मनाचे. मी विद्यापीठाचे आभार मानते.’
मंत्री पंकजा मुंडे यांना अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ (ADYPU) ची डॉक्टरेट पदवी मिळाली आहे.अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्यावतीने क्रिकेटर रोहित शर्मा यालाही डॉक्टरेट पदवी देऊन त्याचा सन्मान करण्यात आला आहे. अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचा (ADYPU) १० दीक्षांत समारंभ शनिवारी एडीवायपीयू कॅम्पस, डी.वाय. पाटील नॉलेज सिटी, चरहोली बीके, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा यालाही मानद डॉक्टरेट (डी. लिट.) प्रदान करण्यात आली. या समारंभाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री विद्या माळवदे यांनी केले.
रोहित शर्मा ( क्रिकेट ), उज्जैनचे आदरणीय गुरुजी प्रमोद शर्मा ( सेवा ), मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे ( सामाजिक कार्य ),सनातन धर्म फाऊंडेशनचे संस्थापक सुदेश अग्रवाल ( सांस्कृतिक ), गोल्डियम इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष रेशेश भन्साळी (औद्योगिक नेतृत्व ), सामाजिक उद्योजक, तंत्रज्ञ आणि धोरणात्मक सल्लागार मनोज पोचट (उद्योग ) आदींना मानद डॉक्टरेट देऊन सन्मान करण्यात आला.