मोठी घडामोड! भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; अखेर अर्चना पाटील यांच्याकडून मोठा खुलासा
bjp politics : अर्जना पाटील यांच्या टीकेमुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर आता अर्चना पाटील यांनी पोस्ट करून वादावर पडदा टाकला आहे.

धाराशिव जिल्ह्यात भाजपमध्येच अंतर्गत वाद निर्माण झाल्याची चर्चा होती. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर जुन्या भाजप कार्यकर्त्यांनी टीका केली. त्यानंतर राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमातून भाजप आमदार राणा पाटील या वेगळल्याने भाजपमधील जुने विरुद्ध नवे नेते असा असंघर्ष सुरु झाला होता. त्यावर टीका केल्यानंतर आता भाजपच्या महिला नेत्या अर्चना पाटील यांनी पोस्ट करत वादावर पडदा टाकला आहे.
” त्याग, निष्ठा आणि परिश्रमातून उभा भाजप परिवार, असं म्हणत जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांचा सोशल मीडियावर मोठा खुलासा केला आहे. भाजपतील जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांमधील वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी फेसबुकवर खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली आहे.
‘भाजपच्या संघटन बांधणीत गेल्या ३० वर्षांत जुन्या कार्यकर्त्यांचे योगदान काय?” असा सवाल करणाऱ्या अर्चना पाटील यांच्या पोस्टमुळे जिल्ह्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. या संबंधित मजकूर माझ्या सोशल मीडिया टीमने पूर्वपरवानगीशिवाय अनवधानाने अधिकृत स्टेटसवर पोस्ट केल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या मी मुलाच्या पदवीदान सोहळ्यासाठी परदेशात असून वेळेतील फरकामुळे ही चूक घडल्याची अर्चना पाटील यांनी माहिती दिली. त्या मजकुरातील कोणत्याही शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते, असे पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
अर्चना पाटील यांची पोस्ट जशीच्या तशी
अर्चना पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, मी सध्या माझ्या मुलाच्या पदवीदान सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी परदेशात असून, वेळेतील फरकामुळे माझ्या सोशल मीडिया टीमने माझी पूर्वपरवानगी न घेता, अनवधानाने माझ्या अधिकृत स्टेटसवर एक मजकूर प्रसिद्ध केल्याचे मला आताच समजले. त्या मजकुरातील कोणत्याही शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते’.
‘भारतीय जनता पार्टी हा लाखो समर्पित कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा आणि परिश्रमातून उभा राहिलेला परिवार आहे. धाराशिव जिल्ह्यात आपण सर्वांनी एकजुटीने आणि कुटुंबाच्या भावनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. या यशामुळे काही घटकांकडून आपल्या एकजुटीला तडा जावा, असे प्रयत्न होत असले तरी, पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित ही माझ्यासाठी सदैव सर्वोच्च प्राथमिकता राहील, असेही त्या म्हणाल्या.