राज्यात बारावी आणि दहावीच्या परीक्षांची जय्यद तयारी, मेट्रोच्या कामांना परीक्षाकाळात स्थगिती देण्याची मनसेची मागणी

मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने एमएमआरडीए, महानगर आयुक्त तसेच वाहतूक पोलिसांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. या निवेदनात शिळफाटा रस्ता, कल्याण शहरातील मेट्रो मार्ग तसेच कल्याण–मुरबाड मार्गावरील काँक्रीट रस्त्यांची कामे परीक्षा कालावधीत थांबवावीत,अशी मागणी केली आहे.

राज्यात बारावी आणि दहावीच्या परीक्षांची जय्यद तयारी, मेट्रोच्या कामांना परीक्षाकाळात स्थगिती देण्याची मनसेची मागणी
hsc and ssc exam
| Updated on: Feb 07, 2026 | 4:45 PM

राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षा जवळ आल्याने शिक्षण विभागाने जय्यद तयारी केली आहे. बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणार आहे. तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेची तयारी म्हणून अनेक जिल्ह्यात परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.दरम्यान, परीक्षा काळात मेट्रोच्या कामांना तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी डोंबिवली मनसेने केली आहे. जर कामांना स्थगिती दिली नाही तर आंदोलनाचा इशारा मनसेने केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांची लगबग सुरू झाली असून शिक्षण विभागाने परीक्षांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे.बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणार असून जिल्ह्यात 28 परीक्षा केंद्रांवर तब्बल 18 हजार 115 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 50 परीक्षा केंद्रांवर 21 हजार 239 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली परीक्षा

परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी मोठ्या संख्येने शिक्षक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली परीक्षा घेण्यात येणार असून संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. शिवाय परीक्षा प्रक्रियेत शिस्त आणि पारदर्शकता राखण्यासाठी सात भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत आणि यशस्वीपणे पार पडतील, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे नजर

दहावी आणि बारावीच्या आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.यंदा जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह कॉपीस प्रोत्साहन देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. परीक्षा केंद्रांवर कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. काही संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.तसेच, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या शिक्षकांवर थेट बडतर्फीची कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्याने दिला आहे.

जालना जिल्ह्यात 12 वी ची परीक्षा 79 केंद्रांवर होणार असून,त्यासाठी एकूण 37 हजार 338 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर 10 वी ची परीक्षा 102 केंद्रांवर पार पडणार असून,त्यासाठी 32 हजार 433 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.दरम्यान परीक्षा शांततेत, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी प्रशासन, शिक्षण विभाग आणि पोलिस यंत्रणा समन्वयाने काम करणार असल्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी म्हटले आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कल्याण आणि डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न बनला आहे. याच पार्श्वभूमीवर 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या परीक्षा कालावधीत कल्याण–डोंबिवली परिसरातील मेट्रो आणि रस्त्यांची सुरू असलेली कामे तात्पुरती बंद ठेवावीत, अशी मागणी डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेने केली आहे.

रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

शिळफाटा रस्त्यावर मेट्रोची कामे सुरू असून काटई गावाजवळ निळजे उड्डाण पुलाचे कामही रेल्वेकडून सुरू आहे. हा संपूर्ण परिसर कायमच वाहनांच्या कोंडीने ग्रासलेला असतो. विशेषतः शिळफाटा रस्त्यालगत मानपाडा, उंबार्ली, काटई, पलावा परिसरात अनेक शाळा असून येथील तसेच डोंबिवली शहरातील विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी या मार्गावरून प्रवास करतात. परीक्षेच्या दिवशी वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. दरम्यान,मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर एमएमआरडीएकडून तीन दिवसांचा वेळ मागण्यात आला असून तीन दिवसांत याबाबत योग्य सूचना आणि निर्णय जाहीर केला जाईल असे सांगण्यात येत आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास ठेकेदार आणि अधिकाऱ्यांविरोधात मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही मनसे विद्यार्थी सेनेने दिला आहे.