‘त्या’ प्रश्नावर शिंदे संतापून म्हणाले कामाचं बोला; मनसेच्या नेत्यानं थेट कामांची यादीच पाठवली

मनसे, ठाकरे गट युतीसंदर्भात प्रश्न विचारताच एकनाथ शिंदे चांगलेच संतापले होते, कामाचं बोला असं त्यांनी म्हटलं, त्यानंतर आता मनसेच्या नेत्याकडून एकनाथ शिंदे यांना थेट कामांची यादीच पाठवण्यात आली आहे.

त्या प्रश्नावर शिंदे संतापून म्हणाले कामाचं बोला; मनसेच्या नेत्यानं थेट कामांची यादीच पाठवली
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 21, 2025 | 2:47 PM

मनसे, ठाकरे गट युतीसंदर्भात प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापले होते, कामाचं बोला असं त्यांनी म्हटलं, त्यानंतर आता मनसे नेते राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना थेट कामांची यादीच पाठवली आहे, त्यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांना काही प्रश्न विचारले आहेत.

 

नेमकं काय म्हणाले राजू पाटील? 

‘जे कामाचे नाहीत, ते श्री प्रभू रामाचे पण नाहीत……! परवा आमचे पालकमंत्री श्री.एकनाथजी शिंदे मनसे-शिवसेना (उबाठा) युतीबाबत विचारलेल्या एका प्रश्नासंदर्भात संबंधित पत्रकाराला चिडून बोलले की कामाचे बोला ! चला तर मी पण काही कामाचे प्रश्न त्यांना विचारतोच. किमान नगरविकास मंत्री व आमचे पालकमंत्री म्हणून तरी उत्तर अपेक्षित आहे.

पलावा पुल कधी होईल ?

लोकग्राम पुल कधी होईल ?

दिवा रेल्वे ROB कधी होईल ?

बिल्डरांच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या कल्याण-तळोजा मेट्रोचे भूसंपादन कधी होईल ?

आणि जर ते झाले नसेल तर ठेकेदाराच्या फायद्यासाठी सुरू केलेले मेट्रोचे हे काम,ज्यामुळे वाहतुक कोंडीत अधिकच भर पडत आहे ते काम कधी स्थगित करणार ?

कल्याण-शीळ रस्ते बाधित शेतकऱ्यांना मोबदला कधी मिळेल व तिसरी लाईन कधी होईल ?

पलावा जंक्शनवरील अनधिकृत बांधकामांच्या जागामालकांना मोबदला देऊन ती बांधकामं तोडून पलावा चौक मोकळा करून दुसऱ्या पुलाचे काम कधी सुरू करणार ?

२७ गावांसाठी असलेली अमृत योजना कधी पुर्ण करणार ?

कल्याण-डोंबिवलीकरांच्या हक्काचा नवी मुंबईला दिलेला १४० एलएलडी पाणी कोटा आम्हाला कधी वर्ग करणार ?

अनधिकृत पणे सुरू केलेला दिवा डंपिंग कधी बंद करणार ?

नवी मुंबईत नव्याने घेतलेल्या १४ गावांच्या विकासासाठी आवश्यक ५९०० कोटी रूपयांचा पॅकेज कधी देणार ?

कल्याण-डोंबिवलीतल्या २७ गावांचा प्रश्न कधी मार्गी लावणार ?

मानपाडा रोड व कल्याण-शीळ रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे कधी हटविणार ?

एकनाथ शिंदेजी उत्तर द्या,’ असं ट्विट राजू पाटील यांनी केलं आहे.