दोन भाऊ एकत्र आले तर या सरकारी दलालाला इतकी मिरची लागली का? मनसेचा सदावर्तेंना टोला

राज ठाकरेंच्या हिंदी लादणीविरुद्धच्या मुंबई मोर्चाला उद्धव ठाकरेंचे समर्थन मिळाल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. गुणरत्न सदावर्तेंनी या मोर्चाला बेकायदेशीर असल्याचा आरोप केला, तर प्रकाश महाजन यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.

दोन भाऊ एकत्र आले तर या सरकारी दलालाला इतकी मिरची लागली का? मनसेचा सदावर्तेंना टोला
| Updated on: Jun 27, 2025 | 1:37 PM

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील, अशी चर्चा सुरु आहे. त्यातच आता राज्य सरकारने हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. या घोषणेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो शेअर करत हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. आता यावरुन राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी हा मोर्चा बेकायदेशीर आहे, हा गल्लीच्या निवडणुकीसाठीचा मोर्चा आहे, असा आरोप केला. यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सदावर्तेंवर चांगलीच टीका केली.

प्रकाश महाजन यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गुणरत्न सदावर्तेंनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. “दोन भाऊ एकत्र आले तर या सरकारी दलालाला इतकी मिरची लागली का?” असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला.

हा सरकारचा दलाल

“हा कोण मुंबईचा फौजदार आणून बसवला आहे. आमच्या मोर्चा काढण्याचा अधिकार देखील नाही म्हणतो. अॅट्रोसिटी कायद्याची धमकी देतो. दोन भाऊ एकत्र आले तर या सरकारी दलालाला इतकी मिरची लागली. हा सरकारचा दलाल आहे. दोन भाऊ एकत्र आले तर इतकी मिरची लागली. आम्ही आमच्या मराठी भाषेच्या हक्कासाठी एकत्र येत होतो. तुम्हाला जसे कायदेशीर हक्क आहेत, तसे आम्हालाही काही कायदेशीर हक्क आहेत”, असे प्रकाश महाजन म्हणाले.

ही फार अभूतपूर्व घटना

“मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि मराठी भाषेसाठी हे पडलेले पहिलं पाऊल आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर पहिली ही घटना घडणार जेव्हा सर्वपक्षीय नेते मतभेद विसरुन मराठीसाठी एकत्र येतात. त्यावेळी ते महाराष्ट्रासाठी एकत्र आले होते आणि आता ते मराठी माणसासाठी एकत्र येतात. ही फार अभूतपूर्व घटना आहे. या घटनेकडे चांगल्या हेतूने मराठी माणूस म्हणून पाहिल पाहिजे. तुम्ही सरकारचे दलाल असल्यासारखी माणसं आणून इथे बसवता”, असा सवालही प्रकाश महाजन यांनी केला.

आमचा हिंदी भाषेला विरोध नाही

“आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. एवढ्या लहान वयात तीन तीन भाषेचं ओझं त्या विद्यार्थ्याला नको. काल शिक्षणमंत्री कोणता प्रस्ताव घेऊन सरकारला भेटले होते. केंद्र सरकारने धोरण ठरवलं, त्यात राज्य सरकार बदल करु शकत नाही. त्यात बदल करण्याचा अधिकार निश्चित राज्य सरकारला असला पाहिजे. पण हा एका भाषेचा प्रश्न नाही. मराठी भाषेवर, संस्कृतीवर आणि मराठी माणसावर होणाऱ्या हल्ल्यासाठी आम्ही एकत्र येतोय, हीच खरी त्यांची अडचण आहे”, असेही प्रकाश महाजन यांनी म्हटले.