
राज्यात मराठीचा मुद्दा पुन्हा प्रचंड तापला असून काही दिवसांपूर्वी अमराठी व्यापाऱ्याला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून मीरा भाईंदर बंद पुकारला होता. त्याला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (मनसे) आज मोर्चाची घोषणा केली होती. मात्र पोलिसांनी त्या मोर्चाला परवानगी नाकारत असंख्य आंदोलकांची धरपकड केली असून त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण पेटलं आहे. या मोर्चाला परवानगी का नाकारली याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोड्या वेळापूर्वीच स्पष्ट केलं होतं. ते (मनसे) जाणूनबुजून असा मार्ग मागत होते, ज्यातून संघर्ष होईल. त्यामुळे मोर्चाला परवानगी नाकरल्याचे फडणवीस म्हणाले.
मात्र आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं असून सरकारला या मोर्चाला परवानगी द्यायचीच नव्हती असा आरोप केला आहे. ती घटना मीरारोडमध्ये घडली, व्यापाऱ्यांनी मोर्चाही मीरा रोड येथे काढला. पण आज ते आम्हाला सांगत होते की तुम्ही (मनसे) घोडबंदर रोड येथे मोर्चा काढा. मला एक गोष्ट सांगा मीरारोडच्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढतं का ? असा सवाल देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.
काय म्हणाल संदीप देशपांडे ?
आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त रूट बदलायला सांगत होतो. मला हे स्पष्टपणे सांगायचं आहे की या मोर्चाची परवानगी पोलिस द्यायला तयार नव्हते. आणि करूट बदलायचा जो विषय आहे, त्याबद्दल सांगायचं झालं तर ती घटना ( व्यापारी मारहाण) घडली मीरारोडमध्ये, त्यानंतर व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोड येथे आणि आम्हाला ते सांगत होते की तुम्ही (मनसे) घोडबंदर रोड येथे मोर्चा काढा. मला एक गोष्ट सांगा मीरारोडच्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढतं का ? याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायचीच नव्हती. तुम्ही गुजरात्यांना परवानगी दिलीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, आमच्यावर पण गुन्हे दाखल करायचे होते. आम्ही कुठे नाही म्हटलं होतं ?
तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार
पण अशा खोट्या समजुती पसरवू नका, मला महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांचा फोन येतोय,सरकारला पण मी कल्पना देऊ इच्छितोय की, अख्ख्या महाराष्ट्रातला माणूस हा मीरा-रोड भाईंदरच्या दिशेने निघालेला आहे. आता आम्हाला बघायचंच आहे की तुमच्या जेलमध्ये जागा जास्त आहे की मराठी माणसाची संख्या जास्त आहे, किती लोकांना तुम्ही जेलमध्ये पाठवणार आहात ना तेही आम्हाला बघायचचं आहे. जोपर्यंत तुम्ही मोर्चाची परवानगी देत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.