महिला दिन हा माँ जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला पाहिजे, राज ठाकरे स्पष्टच बोलले

मनसेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी चिंचवड येथे भाषण केले. त्यांनी महिला दिनाच्या निमित्ताने जिजाऊ साहेबांना अभिवादन करण्याची आणि त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्याची मागणी केली.

महिला दिन हा माँ जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला पाहिजे, राज ठाकरे स्पष्टच बोलले
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 09, 2025 | 12:22 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आज १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. आज मनसेचा १९ वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिंचवडमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी राज ठाकरेंनी जोरदार भाषण केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महिला दिनाच्या दुसऱ्याच दिवशी जोरदार मागणी केली. महिला दिन हा खरंतर जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी भाषण करतेवेळी महिला दिनाचा उल्लेख केला. कालच महिला दिन झाला. “दरवर्षी ८ मार्चला महिला दिन सुरू करतो. काल मला एकाने विनोद पाठवला. म्हणे २१ जून सर्वात मोठा दिवस समजला जातो. हे सर्व झुठ आहे. २१ जून सर्वात मोठा दिवस नाही. महिला दिन सर्वात मोठा दिवस आहे. कारण तो ८ मार्चला सुरु होतो आणि पुढच्या वर्षी ७ मार्चला संपतो. ज्यांची लग्न झाली असेल त्यांना कळत असेल मी काय म्हणतो”, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

महिला दिन खरंतर जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला पाहिजे

“आपल्याकडे दोन पुरुष आले तरी महिला दिनाच्या शुभेच्छा देतात. अरे यात महिला कुठे आहे. मागचा पुढचा विचार नाही, बस शुभेच्छा. महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. पण एका सर्वात मोठ्या महिलेचा विसर पडून देतो. त्या महिलेला विसरतो. हा महिला दिन खरंतर जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला पाहिजे. लहान असताना वडील मुघलांकडे चाकरी करतात हे ज्या मुलीला पाहवलं नाही, लग्न झाल्यावर आपला पती कुठे तरी मुघलांकडे चाकरी करतो हे त्या स्त्रीला पाहवलं नाही, तिने आपल्या पतीला बंड करायला लावलं, जिच्या मनात सुरुवातीच्या मनात स्वराज्य ही गोष्ट पहिल्यापासून होती, तिने आपल्या मुलाकडून स्वराज्य घडवून आणलं. या सर्व इतिहासाच्या मागे एका स्त्रीचं मन होतं. एका महिलेचं मन होतं. ते आपण विसरतो”, असे राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातील महिलांचे ऐतिहासिक योगदान

“आज महाराष्ट्रात इतक्या महिला होऊन गेल्या. देशातील पहिली डॉक्टर महिला आनंदीबाई जोशी. आपण या महिलांचा विचार करतो का? इतक्या महिलांचं योगदान आहे खासकरून महाराष्ट्रातून. पुढारलेल्या स्त्रीया इतिहासातील पाहिल्या तर त्या महाराष्ट्रातील मिळतील”, असेही राज ठाकरेंनी म्हटले.