राज ठाकरेंचे आवडते बॉण्ड नट गेले, फेसबुक पोस्ट लिहित शब्दसुमनांची आदरांजली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहून शॉन कॅनरी यांच्याबाबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना शब्दसुमनांची आदरांजली वाहिली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:38 PM, 1 Nov 2020
राज ठाकरेंचे आवडते बॉण्ड नट गेले, फेसबुक पोस्ट लिहित शब्दसुमनांची आदरांजली

मुंबई :  ज्येष्ठ अभिनेते शॉन कॉनरी (Sean Connery) यांच्या निधनाने जगभरातल्या कलारसिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी फेसबुक पोस्ट लिहून शॉन कॅनरी यांच्याबाबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना शब्दसुमनांची आदरांजली वाहिली आहे. (MNS Raj Thackeray tribute Sean Connery)

शॉन कॉनरी यांचा अभिनय राज ठाकरे यांना खूप आवडायचा. त्यांनी साकारलेला जेम्स बॉण्ड तर राज यांच्या मनातलं विलक्षण आकर्षण… कॉनरी यांच्या अभिनयाचं गारुड राज ठाकरे यांच्या मनावर होतं. त्यांच्याबद्दलचं हेच प्रेम शब्दातून व्यक्त करताना राज लिहितात, “गॉडफादर म्हणलं की मार्लन ब्रँडो ह्यांचाच चेहरा जसा डोळ्यासमोर येतो तसं जेम्स बॉण्ड म्हणलं की बॉन्डपटांच्या चाहत्यांना शॉन कॉनरीच आठवतात…”

शीतयुद्धाच्या काळात इयान फ्लेमिंग ह्यांच्या पुस्तकातील ‘जेम्स बॉण्ड’ हा लोकप्रिय होणं हे स्वाभाविक होतं पण त्या नायकाचं पुस्तकातलं अस्तित्व प्रतिमेच्या विश्वात शॉन कॉनरी ह्यांनी अधिक उत्कट केलं, ठळक केलं… शॉन कॉनरी ह्यांनी 6 बॉन्डपट केले पण त्या बॉण्डपटातील जेम्स बॉण्ड त्यांनी इतका घट्ट रुजवला की त्यामुळे पुढे जेम्स बॉण्ड साकारणाऱ्या प्रत्येक नटाची दमछाक झाली, असं राज म्हणाले.

कधीही सूर्य न मावळण्याची वलग्ना करणाऱ्या ब्रिटिश साम्रज्याचा सूर्य दुसऱ्या महायुद्धानंतर मावळतीला लागला आणि अशा वेळेस जागतिक राजकारणात ब्रिटनचं महत्व उत्तरोत्तर कमी होत असताना किमान प्रतिमा पातळीवर ब्रिटन ही महासत्ता आहे, हा भास कायम ठेवण्यात ‘इयान फ्लेमिंग’ ह्यांच्या प्रतिभेतून उतरलेला आणि ‘शॉन कॉनरी’ ह्यांच्या प्रतिमेतून उभा राहिलेला ‘जेम्स बॉण्ड’ कारणीभूत आहे. प्रतिभा आणि प्रतिमेच्या संगमाच्या जोरावर एखादया देशाची सॉफ्ट पॉवर निर्माण होणं आणि ती अनेक दशकं टिकणं हे जगातील दुर्मिळ उदाहरण असावं, असं राज म्हणाले.

शॉन कॉनरीना पडद्यावर पाहताना प्रेक्षकाला स्वतःच्यातल्या मर्यादा, उणिवा जाणवत राहतात पण तरीही मी पण मर्त्य माणूस आहे, सगळे लोभ, मोह हे मला पण सुटले नाहीत हे दाखवत त्यांनी ‘जेम्स बॉन्ड’ला वास्तवाच्या जगात घट्ट रोवून उभं केलं, हे शॉन कॉनरी ह्यांचं यश आणि म्हणूनच आजही माझे सगळ्यात आवडते बॉण्ड नट हे शॉन कॉनरीच आहेत, असं म्हणत. शॉन कॉनरी ह्यांच्या स्मृतीस राज यांनी विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे.

(MNS Raj Thackeray tribute Sean Connery)

संबंधित बातम्या

पावसाने योग जुळवून आणला, राज ठाकरेंनी सुबोधचा सिनेमा पाहिला

मला दहावीला फक्त 37 टक्के गुण; ‘तो’ सिनेमा मी 32 वेळा पाहिला : राज ठाकरे

‘हा’ हिंदी चित्रपट पाहाच, राज ठाकरेंचं आवाहन