मराठा आणि ओबीसी आरक्षण वादावर मनसेची भूमिका काय? पहिली प्रतिक्रिया समोर

नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारी, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था आणि रखडलेल्या विकासकामांमुळे मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येऊन सरकारविरोधात मोर्चा काढणार आहेत. बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चात मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांवर जोरदार टीका करण्यात आली.

मराठा आणि ओबीसी आरक्षण वादावर मनसेची भूमिका काय? पहिली प्रतिक्रिया समोर
| Updated on: Sep 12, 2025 | 2:26 PM

महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यातच आता नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारी, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था आणि रखडलेल्या विकासकामांवरून शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र येत सरकारविरोधात मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व मनसे नेते बाळा नांदगावकर करणार आहेत. यावेळी बाळा नांदगावकर पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर विशेषतः निशाणा साधला.

यावेळी बाळा नांदगावकरांनी नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीवर तीव्र चिंता व्यक्त केली. नाशिकमध्ये दिवसागणिक खून होत आहेत. शहरातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. विशेषतः शाळा आणि कॉलेजच्या आजूबाजूला खुलेआम एमडी ड्रग्ज विकले जात आहेत. यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. सरकारचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. यावर सरकार म्हणून काय भूमिका घेणार, असा सवाल बाळा नांदगावकर यांनी केला.

नुकत्याच गाजलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाची चौकशी पुढे का सरकली नाही, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच याप्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. केवळ शहरी समस्याच नाही, तर ग्रामीण भागातील प्रश्नही सुटलेले नाहीत, असे बाळा नांदगावकर म्हणाले. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही आणि पीक विम्याचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदिवासी शिक्षकांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते, पण तोही अजून सुटलेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी कुठेही दिसत नाही

नांदगावकरांनी नाशिकच्या विकासकामांच्या दुर्दशेवरही बोट ठेवले. ज्या नाशिकला सरकारने दत्तक घेतल्याचा दावा केला, त्याच शहराला आता दत्तक घेऊन काय केले? स्वतःला कर्तबगार समजणारे पालकमंत्री गिरीश महाजन, तसेच मंत्री छगन भुजबळ आणि दादा भुसे काय करत आहेत? नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी कुठेही दिसत नाही. शहरात सुरू असलेले विकास प्रकल्प उद्ध्वस्त झाले आहेत. मनसेच्या काळात चांगली कामे झाली होती, पण ती कामे तरी टिकवली का? असा सवाल बाळा नांदगावकर यांनी केला.

राज ठाकरे यांची जन्मभूमी मुंबई असली तरी त्यांची कर्मभूमी नाशिक आहे. गेल्या काही काळात नाशिककरांचे प्रेम कमी झाले असले तरी राज ठाकरेंचे प्रेम कमी झालेले नाही. नाशिक महापालिकेत पूर्ण सत्ता नसतानाही मनसेने चांगली कामे केली, असे बाळा नांदगावकर म्हणाले.

राज ठाकरेंच्या पोटात आणि ओठात एकच

यावेळी आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावरही नांदगावकरांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली. घटनेला धक्का न लावता कुणालाही आरक्षण देण्यास हरकत नाही. मात्र आमची सुरुवातीपासूनची भूमिका ही आर्थिक निकषांवर आरक्षण असावी अशी आहे. सर्वच बाबतीत राजकारण केले जात असून आरक्षणाच्या बाबतीतही तेच सुरू आहे. राज ठाकरे हे एकमेव नेते आहेत, ज्यांच्या पोटात आणि ओठात एकच आहे, अशी खंत बाळा नांदगावकरांनी व्यक्त केली.