फडणवीस, निर्मला सीतारामन, जेटली, मनसेने बड्या नेत्यांची इंग्लिश स्कूलची यादीच काढली, म्हणाले यांच्या हिंदुत्वावर शंका…

भाजप नेते अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलांच्या इंग्रजी माध्यमातील शिक्षणावर टीका केली होती. यावर मनसेचे गजानन काळे यांनी धारदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी अनेक भाजप नेत्यांच्या मुलांची इंग्रजी शाळांची यादी सादर केली.

फडणवीस, निर्मला सीतारामन, जेटली, मनसेने बड्या नेत्यांची इंग्लिश स्कूलची यादीच काढली, म्हणाले यांच्या हिंदुत्वावर शंका...
raj thackeray
Updated on: Nov 28, 2025 | 4:14 PM

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलांच्या इंग्रजी माध्यमातील शिक्षणावर भाजप नेते अमित साटम यांनी टीका केली होती. या टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी अत्यंत धारदार शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी गजानन काळे यांनी भाजप नेत्यांची यादीच सादर केली आहे. कोण कुठल्या शाळेत शिकले यावरून भाषेचा कडवटपणा आणि धर्माबद्दलचा अभिमान ठरत नाही, अशा शब्दात गजानन काळे यांनी अमित साटम यांना सुनावले आहे. तसेच त्यांना सांभाळून बोलण्याचा इशारा दिला आहे.

गजानन काळे यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यात त्यांनी भाजपचे मुंबई शहराध्यक्ष अमित साटम यांच्यावर निशाणा साधला. ठाकरेंची मुले इंग्लिश शाळेत शिकली या जुन्या कढीला ऊत आणण्याचा परत एकदा केविलवाणा प्रयत्न करून मराठीबद्दल शंका घेणारे भाजपचे डोक्यावर पडलेले नवीन मुंबई शहराध्यक्ष यांच्या माहितीसाठी… असा टोला गजानन काळे यांनी लगावला आहे.

उघडा डोळे आणि वाचा नीट

भाजप नेत्यांनी वारंवार हा मुद्दा उपस्थित करुन केवळ मराठी भाषिक आणि मराठी अस्मितेबद्दल शंका घेण्याचा प्रयत्न केला. गजानन काळे यांनी साटम यांना उघडा डोळे आणि वाचा नीट… असा सल्ला देत भाजपच्या बड्या नेत्यांच्या शिक्षणाचे दाखले दिले. या नेत्यांनी मिशनरी शाळांमध्ये शिक्षण घेतल्यास, त्यांच्या ‘हिंदुत्वावर’ शंका घ्यायची का, किंवा त्यांना ‘हिंदुत्ववादी शिक्षण देणाऱ्या शाळा’ मिळाल्या नाहीत का? असा सवालही गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.

लालकृष्ण अडवाणी : St. Patrick School
अरुण जेटली : St. Xavier’s School
निर्मला सीतारामन : St. Philomena’s School आणि Holy Cross School
जे. पी. नड्डा : St. Xavier’s School, पटणा
पीयूष गोयल : Don Bosco School, माटुंगा

फडणवीसांना खुश करण्यासाठी तोंड चालवणारे चाटम

उद्धव ठाकरे यांच्या नातवाच्या शिक्षणाबद्दल बोलल्यामुळे काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबाचाही उल्लेख केला. अमृता फडणवीस: St. Joseph Convent School, नागपूर, दिविजा देवेंद्र फडणवीस: The Cathedral and John Connon School, Fort मुंबई, हे सगळे ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले आहेत, असे काळे यांनी ठामपणे सांगितले. बाकी शहाण्यास फार सांगणे न लागे. फक्त फडणवीसांना खुश करण्यासाठी तोंड चालवणारे ‘चाटम’, यापुढे सांभाळून बोला! असे म्हणत त्यांनी साटम यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले.