राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हटल्यानं मिटकरींच्या गाडीवर हल्ला, कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी काल राज ठाकरे यांना सुपारी बहाद्दर म्हटलं आणि आज त्यांची गाडी फुटली. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला.

राज ठाकरे यांना सुपारी बहाद्दर म्हटल्यानंतर, अकोल्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरींची गाडी फोडली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केला त्यावेळी मिटकरी गाडीत नव्हते, तर विश्रामगृहाच्या आत होते. मात्र हा हल्ला झाल्यानंतर मनसेच्या गुंडांकडून चाकू आणि अॅसिड हल्ल्याचा प्रयत्न होता, असा आरोप मिटकरी यांनी केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मिटकरींनी सुपारी बहाद्दर म्हटल्यानंतर, मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरींना अकोल्याच्या विश्रामगृहात गाठलं. पण ज्या ठिकाणी मिटकरी होते, तिथं आक्रमक मनसेचे कार्यकर्ते पाहून पोलिसांनी दार लावलं आणि कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आता मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर का म्हटलं आणि प्रकरण तोडफोडीपर्यंत का आलं तर, राज ठाकरे यांनी पुण्याच्या पुरावरुन अजित पवारांबद्दल वक्तव्य केले होते. अजित पवार पुण्यात नसतानाही धरण वाहून गेलं, अशी खोचक टीका राज ठाकरेंनी केली होती.
धरणाचा उल्लेख करुन अजित पवारांना राज ठाकरेंनी डिवचलं. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मिटकरींनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंना थेट सुपारी बहाद्दर म्हटलं. ज्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्यांना अटक करण्याची मागणी आता मिटकरींनी केलीये. पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ठिय्याही मांडला. अजित पवारांनी मिटकरींना फोन करुन, विचारपूस केली. तर राज ठाकरेंवरच कारवाई करा, अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी केलीय.
राज ठाकरेंबद्दल सुपारी सारखे शब्द वापरल्यानं हल्ला केल्याचं मनसेचं म्हणणंय. तर फडणवीसांच्याच गृहखात्यांनं राज ठाकरे आणि हल्ले खोर कार्यकर्त्यांविरोधात कारवाईसाठी मिटकरी आक्रमक आहेत.
अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर तोडफोड प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, सौरभ भगत, अरविंद शुक्ला, ललित यावलकर, जय मालोकार, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे, मंगेश देशमुख, रुपेश तायडे, दीपक बोडखे, मुकेश धोनफळे, गणेश वाघमारे, प्रशंसा आंभेरे बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. दरम्यान सध्या सर्व मनसे कार्यकर्ते फरार आहेत. भारतीय न्याय संहिता अंतर्गत 189(2), 190, 296, 49, 324(3), 324(4), 333, 351(3)'(3). नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
