ताडोबात आता मोबाईलवर बंदी

ताडोबात आता मोबाईलवर बंदी

निलेश डाहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर : सतत व्हायरल होणारे व्हिडीओ, वाघांसह सोशल मीडियावर टाकले जाणारे फोटो, हे फोटो टाकल्याने वाघ अधिवास स्थळ उघड झाल्याने वाघासह इतर वन्यजीवांना होणारा त्रास, यावर ताडोबा प्रशासनाने जालीम उपाय शोधला आहे. येत्या एक डिसेंबरपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्याला तत्काळ प्रकल्पाबाहेर काढले जाणार आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मोबाईल फोनवर सरसकट बंदी लावण्याचा निर्णय ताडोबा प्रशासनाने घेतला आहे. ही सरसकट बंदी एक डिसेंबरपासून अंमलात येणार आहे.

विशेष म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चालक आणि गाईड यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. विशेषत: छोटी मधू या वाघिणीने पर्यटकांच्या एका जिप्सीवर केलेला हल्ला आणि माया वाघीण आणि तिच्या पिल्लांचा पर्यटकांनी अडवलेल्या रस्त्याचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला होता. हे दोन्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ताडोबात नियम कसे पायदळी तुडवले जातात, हे स्पष्ट झालं होतं आणि या विरोधात कारवाईची मागणी झाली होती. मात्र यावर कारवाई करण्याऐवजी ताडोबा प्रशासनाने असे व्हिडिओ तयारच  होणार नाही, असा उपाय केला आहे.

या मोबाईलबंदी मागे ताडोबा प्रशासनाने पर्यटकांनी काढलेल्या फोटो आणि व्हिडिओमुळे वाघांचं लोकेशन जाहीर होत असल्याचे कारण पुढे केलं आहे. सोबतच गाईड आणि जिप्सी चालक मोबाईल ने एकमेकांशी संपर्क करून वाघ ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी गर्दी करतात, पर्यटक वाघांना त्रास देऊन फोटो आणि सेल्फी काढतात अशीही कारणं देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे व्याघ्र प्रकल्पात मोबाईल बंदी करणारा ताडोबा राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प ठरला आहे. या मोबाईल बंदीचा नियम मोडणाऱ्यांवर ताडोबा प्रशासन कठोर कारवाई करणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI