
माथेरान येथील एको पॉईंट येथील दरीत एक कुत्रा तीन दिवस आधी कोसळून झाडाला अडकलेल्या अवस्थेत होता. एका झाडाला अडकून पडलेला हा मुका प्राणी तीन दिवस पावसात भिजल्याने भुकेने ओरडत होता.मात्र या मुक्या प्राण्याला सह्याद्री आपदा संस्थेच्या सदस्यांनी सुखरुपपणे जिवंत बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. या आपदा संस्थेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
माथेरान या पर्यटन स्थळी असलेल्या एको पॉईंटजवळील खोल दरीजवळून भटकंती करणारा एक कुत्रा दरीत कोसळला होता.हा कुत्रा त्या दरीत कोसळत असताना जंगलातील एका झाडाला अडकला.सध्याच्या पावसामुळे निसरड्या झालेल्या जमिनीवर गवताळ भागात पाय घसरत तो एका अतिशय धोकादायक अशा मधल्या टप्प्यावर जाऊन अडकला. दरीचे कड्यालगत असलेल्या त्या भागातून ना तो वर चढू शकत होता ना खाली उतरू शकत होता.
पावसामुळे जमीन निसरडी झाली होती आणि आजूबाजूला खोल मृत्यू दरी अशा बिकट अवस्थेत हा मुका प्राणी सापडला होता. सलग तीन दिवस हा मुका प्राणी पावसात भिजत होता आणि त्यावेळी कोणत्याही प्रकारचे खाद्य मिळत नसल्याने तो तहान आणि भूकेने विव्हळत होता. सोमवारपासून माथेरानमध्ये प्रचंड पाऊस सुरू असताना भर पावसात थरथरत झाडाच्या फांद्यात अडकून पडलेला हा मुका प्राणी बचावासाठी भुंकून मदत मागत होता.
येथे पोस्ट पाहा –
माथेरान येथे तीन दिवस दरीत अडकून पडलेल्या कुत्र्याला जीवदान, गिर्यारोहकांनी केली सुखरुपपणे सुटकाhttps://t.co/XtVuQZ6Cer#dogsafelyrescueinmatheran #matheran #matherannews #dogsafelyrescue pic.twitter.com/qkvu5Uv0RA
— Atul B. Kamble (@atulkamble123) July 24, 2025
हा मुका जीव दोन दिवस उपाशीपोटी, थरथरत तसाच उभा होता. पावसाची धार, थंडी, भूक आणि एकटेपणाचं भय हे सर्व हा मुका प्राणी अनुभवत होता.ही माहिती स्थानिक एको पॉइंटमधील नागरिकांनी माथेरानमधील समाज माध्यमांवर पोस्ट करीत दरीत भुंकत असलेल्या कुत्र्याबद्दल कळवले. ही बाब माथेरान मधील सह्याद्री आपदा संस्थेला मिळाली आणि त्यांनी आज रेस्क्यू करण्यास सुरुवात केली.
आपदा संस्थेचे सदस्य वैभव नाईक,उमेश मोरे, सुनील ढोले,चेतन कळंबे या सर्वांनी हवामानाची तमा न बाळगता आणि सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत त्या कठीण भागात उतरून या कुत्र्याला यशस्वीपणे रेस्क्यू यशस्वी केले. आपदा संस्थेच्या गिर्यारोहकांनी आपला जीव धोक्यात घालून या मुक्या प्राण्याला वाचवले त्याला सुखरूपपणे दरी बाहेर काढले. आपदा संस्थेचे या कार्याबद्दल कौतुक करण्यात येत असून तो मुका जीव जिवंत असून दरी बाहेर आल्यानंतर हा कुत्रा शांतपणे उभा राहिल्याचे पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.