
“मुंबईत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात मराठी बांधव आले. त्यांच्या मागण्या होत्या आरक्षणासंदर्भात. पावसात, चिखलात मनोज जरांगे आणि त्यांची लोकं आंदोलन करत होते. काल सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. या बाबत जरांगे समाधानी असतील, तर आम्ही समाधानी आहोत” असं संजय राऊत म्हणाले. “शेवट गोड झालेला आहे आणि स्वत: आंदोलकांनी गुलाल उधळलेला आहे. तसा नवी मुंबईतही गुलाल उधळला होता. पण नवी मुंबईतील गुलाल आणि मुंबईत उधळलेला गुलाल यात काय तफावत आहे, याकडे अभ्यासक म्हणून मला पहायचं आहे” असं संजय राऊत म्हणाले. “मनोज जरांगे पाटील यांचं समाधान तर सगळ्यांच समाधान. त्यांच्या यातना, क्लेश सरकारने संपवल्या असतील, आम्ही सरकारचं सुद्धा अभिनंदन करतो” असं संजय राऊत म्हणाले.
“छगन भुजबळ यांचं म्हणणं अत्यंत बरोबर आहे. जो पर्यंत पूर्ण अध्यादेश हातात येत नाही. तो पर्यंत कोणी आकंड तांडव करु नये. सर्व समाज मराठी बांधव आहेत. ओबीसी असतील, मराठा समाज असेल, हे शेवटी मराठी बांधव आहेत. मराठी माणसाची भक्कम एकजूट जातीपातीच्या मुद्यावर कोणी तोडण्याचा प्रयत्न करु नये. ओबीसी, मराठा, घाटी, ९२ कुळी, ९६ कुळी, हे भेद गाडून मराठी माणसाची एकजूट रहावी हे बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं होतं” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
…तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे
“भाजपचे नेते अजूनही मनोज जरांगे यांची कुचेष्टा करत आहेत. भाजपचं पडद्यामागच म्हणणं वेगळं आहे. जरांगे पाटील समाधानी आहेत हे महत्त्वाच. कारण यातना, क्लेश त्यांच्या शरीराला होत होता. सरकारने तोडगा काढून त्यांचं उपोषण सोडवलं असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. भाजप हा दुतोंडी गांडूळासारखा पक्ष आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केला.
‘मोदी सध्या रडतायत कोणीतरी त्यांच्या आईला शिव्या दिल्या’
“जेव्हा जरांगे पाटील इथे आले तेव्हा भाजपची भाषा वेगळी होती. ती कोणत्या प्रकारची हीन दर्जाची भाषा होती ती भाषा मोदी यांनी ऐकायला पाहिजे. मोदी सध्या रडतायत कोणीतरी त्यांच्या आईला शिव्या दिल्या, असं त्यांचं म्हणणं आहे. इथे जरांगे पाटील यांच्या संदर्भात भाजपचे नेते कोणती भाषा वापरतायत हे मोदी यांनी ऐकलं पाहिजे. मग, तुम्हाला समजेल की, मी भाजपला दुतोंडी गांडूळ का म्हणतो?” असं संजय राऊत म्हणाले.
फडणवीसांच कौतुक का केलं?
“जेव्हा मनोज जरांगे पाटील इथे आले, तेव्हा टोकाचा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. टोकाची, घाणेरडी भाषा वापरली गेली, एकटे फडणवीस सोडले, तर सगळ्यांनी ही भाषा वापरली. मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचं कौतुक करीन. आंदोलक नेत्यांनी फडणवीस यांच्यावर जहरी भाषेत टीका केली. त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी संयम सोडला नाही, हे कौतुकास्पद आहे” असं राऊत म्हणाले.
‘पुढच्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होईल’
“नरेंद्र मोदी अखेरच विदेशी पर्यटन करुन घेत आहेत. तो त्यांचा छंद आहे. देशात आले आईला शिव्या घातल्या म्हणून रडू लागले. कोणीही मोदींच्या आईविषयी अपशब्द वापरलेला नाही. राहुल गांधी सुस्कृत नेते आहेत. पुढच्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होईल” असा दावा संजय राऊत यांनी केला.