‘पवारांविषयी मोदींना इतका आदरभाव असता, तर…’, संजय राऊत यांचे बोचरे शब्द

"आमची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढण्याची तयारी सुरु आहे. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिका आणि महाराष्ट्राच निवडणुका होतील. निवडणुका कोणाबरोबर लढायच्या याबद्दल पक्षामध्ये चर्चा सुरु आहे. निर्णय घेण्याचे अधिकारी पक्षप्रमुखांनी स्थानिक पातळीवर दिले आहेत" असं संजय राऊत म्हणाले.

पवारांविषयी मोदींना इतका आदरभाव असता, तर..., संजय राऊत यांचे बोचरे शब्द
Sharad Pawar-PM Modi
| Updated on: Jun 11, 2025 | 10:48 AM

“दोन वेगळे पक्ष आहेत. त्यांच्या पक्षांच्या मेळाव्यांवर त्यांनी मांडलेल्या भूमिकांवर आम्ही का मत व्यक्त करायची?. अजित पवार यांनी जी भूमिका मांडली, ती लोकशाहीत विरोधी पक्षाच जे स्थान आहे, त्याला छेद देणारी भूमिका आहे. आम्ही विरोधी पक्षांनी आंदोलन केली नाहीत तर सत्ताधारी माजतील, राज्य, देश लुटतील महापालिका, जिल्हा परिषदा याच्यावर डाके टाकतील. जनतेच्या प्रश्नांना कोणी वाचा फोडणार नाही” असं संजय राऊत म्हणाले. “शरद पवरांनी पक्ष उभा केला तो आंदोलनातून. शिवसेनेसारखा पक्ष आंदोलनातून उभा राहिला, आम्हाला त्याचा अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्राच आंदोलन झालं नसतं, तर आज अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले नसते” असं संजय राऊत म्हणाले.

“तुम्ही आंदोलनाचा अपमान करु नका. सत्तेत राहून लोकांची काम ऐकेकाळी करता येत होती. पण सत्ता आजकाल तिजोरी लुटायलाच वापरली जाते. गेल्या दहा वर्षात भाजपा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांनी सत्तेत राहून सर्व क्षेत्रात आरोग्य, महसूल, शिक्षण असा एकही विभाग नाही की जिथे लुटमार केली नाही. जनतेचे कुठले प्रश्न मार्गी लावले हे नरेंद्र मोदी यांना विचारा. आज मजबूत सत्ता आहे. तरीही ट्रम्प यांनी दम देताच पाकिस्तान विरुद्ध दहशतवादाविरुद्धचा संघर्ष तुम्हाला थांबवावा लागला. ही सत्ता आहे. सत्तेत राहून ज्यांनी प्रचंड लुटमार केली. चौकशी सुरु झाल्यावर ते पुन्हा सत्तेत गेले. जनतेची सेवा करायला गेले कोणी म्हणत असेल तर ते ढोंग आहे. स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी सत्तेत गेले” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

‘ते ढोंग आहे’

परदेशातून आलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळांची काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याकडे पंतप्रधान मोदींनी शरद पवारांच्या प्रकृतीविषयी चर्चा केली. यावर संजय राऊत म्हणाले की, “प्रकृतीविषयी चर्चा करणं याला स्नेह किंवा आदरभाव म्हणत नाहीत, तो शिष्टाचार आहे. पवारसाहेबांविषयी इतका आदरभाव, शिष्टाचार असता, ज्या पवारसाहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या प्रतिकुल परिस्थितीत मदत केली, त्यांचा पक्ष, घर अशा पद्धतीने फोडलं नसतं. नरेंद्र मोदी, अमित शाह जे केल्यासारखं दाखवतात ते ढोंग आहे”

‘खोटारडेपणाचा नोबेल नरेंद्र मोदींना द्यावा लागेल’

“पवारसाहेबांची तब्येत उत्तम आहे. पवारसाहेबांची तब्येत कशी आहे, हे पंतप्रधानांना माहित असायला हवं. मी चौकशी केली. मी किती भावनाशील माणूस आहे, मला किती आदर आहे, एखाद्या व्यक्तीविषयी. ज्या शिवसेनाप्रमुखांचा पक्ष फोडला, अधून-मधून भाषणातून शिवसेनाप्रमुखांच गुणगान करतात. मी कसा शिवसेनाप्रमुखांचा भक्त आहे हे दाखवायचा प्रयत्न असतो. जर खोटारडेपणा, ढोंग यांना नोबेल पुरस्कार देण्याची वेळ आली, तर तो भाजप अध्यक्ष किंवा नरेंद्र मोदींना द्यावा लागेल” अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.