
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होत आहे. मात्र, महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वूमीवर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याचे सध्या बघायला मिळतंय. राज्यात युती किंवा महाविकास आघाडी असणारे राजकीय पक्ष महापालिका निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी विरोधात लढत आहेत. दुसरीकडे अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळे होत एनसीपी फोडली. मात्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढवत आहेत. राज्यात भाजपासोबत अजित पवारांची युती आहे. पण पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या विरोधात निवडणुका लढताना अजित पवार दिसत आहेत. आता येणाऱ्या 16 जानेवारी 2026 रोजी या नव्या राजकीय समीकरणांचा नक्की फायदा कोणाला होईल आणि फटका कोणाला बसेल हे स्पष्ट होईल.
आता नुकताच खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर टीका केली. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, सध्या राज्यात जे काही सुरू आहेत ते यापूर्वी कधीही बघितले नाही. अजित पवारांवर भाजपाकडून होणाऱ्या टीकेविषयी बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, भाजपा अजित पवारांवर टीका एकीकडे करत आहे तर दुसरीकडे सोबत काम करत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आत्मचिंतन केले पाहिजे.
ते जेंव्हा आरोप करतात, त्यामध्ये खरंच तथ्य असते की नाही. अजित पवारांनी केलेल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, या विधानावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, मी अजित पवारांनी नेमके काय विधान केले हे ऐकले नाही, त्यांनी काय म्हटले हे ऐकल्यावरच मी बोलू शकते. सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की, सध्या आम्ही फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठीच फक्त एकत्र लढत आहोत.
बाकी राज्यातही प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या तेथील परिस्थितीनुसार लढत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये नक्की कोण कोणासोबत आहे याचा हिशोब खरंच कळत नाही. आमच्या कुटुंबामध्ये कधीच अंतर आले नव्हते, त्यामुळे आमचे काैटुंबिक संबंध आहे तसेच राहिले. आमचे राजकीय मतभेद कालही होते आणि आजही आहेत. ते पुढे कसे राहतील, याच्याबद्दल वेगळी चर्चा होऊ शकते, असे अजित पवारांसोबत एकत्र येण्याच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले.