बारामतीत थरार, सुप्रिया सुळे यांचा संताप, त्या घटनेचा व्हिडीओ केला शेअर, पोलिसांवर..
बारामतीमध्ये परिसरात धक्कादायक घटना घडली. ज्यामुळे एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. थेट दिवसाढवळ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. अगोदर कॉल करून खंडणी मागण्यात आली होती.

बारामती शहरात धक्कादायक घटना घडली. एमआयडीसी परिसरातील बांधकाम व्यावयासिक राजन कोळेकर यांच्या गाडीवर शनिवारी सहा वाजता हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत ते थोडक्यात बचावले. धक्कादायक बाब म्हणजे शनिवारी कोळेकर यांच्या इंन्टाग्रामवर अज्ञान व्यक्तीचा धमकीचा फोन आला होता. या फोनच्या माध्यमातून दोन लाखांची खंडणी मागण्यात आली होती. दुपारच्या वेळी धमकीनंतर सहा वाजता अज्ञान हल्लेखोरांनी कोळेकर यांच्या घराजवळ धाव घेतली. घराचे गेट उघडून थेट गोळीबार केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी टीका करत सोशल मीडियावर घटनेचा व्हिडीओही शेअर केला. हल्लेखोर दुचाकीवर आल्याचे सीसीटीव्ही व्हिडीओत दिसत आहे.
सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट-
बारामती आणि परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून गुन्हेगारीने येथे डोकेवर काढले आहे. एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी देऊन थेट त्यांच्या घराच्या आवारात घुसून गोळीबार करण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे. अशा घटनांमुळे सध्या बारामतीमधील व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत.
नेमके बारामती पोलीस काय करत आहेत? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही का? व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावणे आणि थेट घरासमोर येऊन गोळीबार करणे हे प्रकार बारामतीसारख्या शहरात घडतात हे अतिशय दुर्दैवी आहे. बारामती पोलीस शहर आणि परिसरात कायदा सुरक्षा अबाधित राखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करीत आहे याचा सर्वंकष आढावा घेण्याची गरज आहे.
कायद्याचे राज्य अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची तातडीने गांभीर्याने दखल घ्यावी. या प्रकरणाचा सखोल तपास करून गोळीबार करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात. त्यांची ही दहशत कायमची मोडून काढावी. कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्य नागरीक आणि व्यावसायिक यांना धमकाविण्याचे आणि त्यांच्यावर अशा पद्धतीने हल्ले करण्याचे प्रकार तातडीने थांबले पाहिजेत.