Satara Tarli Project News: अदाणींच्या तारळी प्रकल्पाला दुहेरी दणका! आता थेट काम बंद करण्याचे आदेश
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्पाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आधीच राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने अदानी कंपनीला प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिले असताना आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या प्रकल्पाला दणका दिला आहे.

Satara Tarli Project News: सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाला सध्या जोरदार विरोध होत आहे. एकीकडे या प्रकल्पाला स्थानिकांसह वन्यप्रेमींनी जोरदार विरोध केला आहे. अशातच आता या प्रकल्पाला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अदाणींच्या या प्रकल्पाला दुहेरी दणका बसला आहे.
अदाणींच्या प्रकल्पाला दुहेरी दणका!
समोर आलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्पाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आधीच राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने अदानी कंपनीला प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिले असताना आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या प्रकल्पाला दणका दिला आहे. आवश्यक संमती आणि पर्यावरणीय मंजुरीशिवाय काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंडळाने उत्खनन आणि बांधकामाची कामे तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रदूषण मंडळाने दिले काम बंद करण्याचे निर्देश!
मौजे सावरघर येथील गट क्रमांक ३३ आणि ३४ मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पाहणीत आवश्यक परवानग्यांशिवाय उत्खनन आणि विकासकाम सुरू असल्याचे आढळून आले. त्यानंतर सध्या सुरू असलेली तसेच प्रस्तावित उत्खनन आणि बांधकामाची कामे तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, मंडळाची पूर्वपरवानगी मिळाल्याशिवाय कोणतेही काम पुन्हा सुरू करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाबाबत मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे आधी राष्ट्रीय वन्यजीव मंडळ आणि आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशामुळे तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्पाच्या अडचणीत भर पडली आहे.
नेमका काय आहे हा प्रकल्प?
तारळी नदीच्या खोऱ्यात अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा हा प्रकल्प आहे. याठिकाणी तारळी पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प उभारला जात आहे. 1500 मेगावॉट क्षमतेचा पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प आहे. यामध्ये विजेची मागणी जास्त असताना वरील जलाशयात पाणी खाली सोडून वीज निर्मिती केली जाते आणि मागची कमी असताना पेच पाणी पुन्हा वर पंप केले जाते.