…तरच तुमच्या खात्यात येणार पैसे? लाडकी बहिण योजनेसाठी सरकारची नवीन अट काय?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी विविध जिल्ह्यातून लाखो महिलांनी अर्ज केले आहेत. मात्र यातील 27 लाख महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यास सरकारला अडचणी येत आहेत.

...तरच तुमच्या खात्यात येणार पैसे? लाडकी बहिण योजनेसाठी सरकारची नवीन अट काय?
| Updated on: Aug 14, 2024 | 12:31 PM

Mukhayamantri Ladki Bahin Yojana : सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळावा यासाठी असंख्य महिलांची धावपळ सुरु आहे. या योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यातील अनेक महिलांनी सेतू केंद्रांवर आणि तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केलेल्या 27 लाख महिलांना आता एका नव्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी विविध जिल्ह्यातून लाखो महिलांनी अर्ज केले आहेत. मात्र यातील 27 लाख महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यास सरकारला अडचणी येत आहेत. कारण या 27 लाख महिलांनी त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही. त्यामुळे आता या महिलांसमोर नवीन पेच निर्माण झाला आहे.

लाडक्या बहि‍णींना अडचणींचा सामना करावा लागणार

लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरल्यानंतरही 27 लाख महिलांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. या 27 लाख अर्जदार महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याची माहिती समोर आली आहे. बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्याने सरकारकडून पैसे पाठवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे येत्या तीन दिवसात 27 लाख महिलांनी त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे, असे आव्हान सरकारकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहि‍णींना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

नेमकी योजना काय?

  • या योजनेला आता दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 01 जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
  • या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे 1) रेशन कार्ड 2) मतदार ओळखपत्र 3) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4) जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे.
  • सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
  • सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे.
  • बाहेरच्या जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा 1) जन्म दाखला 2) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3) आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.
  • 2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
  • सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.