
मुंबई, पुणे, नाशिकसह ठिकठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा दहा दिवसांचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. यानंतर आता काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यंदा मुंबई आणि पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकांनी मागील वर्षाचे सर्व विक्रम मोडले. पुणे शहरातील विसर्जन मिरवणूक तब्बल ३० तासांहून अधिक काळ सुरू होती. ढोल-ताशांचा आवाज आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषाने संपूर्ण वातावरण भारवले होते.
मुंबईतही गिरगाव चौपाटीवर आणि इतर विसर्जन स्थळांवर गणेशभक्तांचा जनसागर लोटला होता. पावसाच्या सरी कोसळत असतानाही भाविकांच्या उत्साहात किंचितही घट झाली नाही. यंदा अनंत चतुर्दशी निमित्ताने गणेशोत्सवाच्या काळात एकूण ३६ हजार ६३२ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. ज्यात ५,८५५ सार्वजनिक आणि ३०,४६८ घरगुती गणपतींचा समावेश होता. या मिरवणुकांमध्ये काही ठिकाणी दुर्दैवी घटनाही घडल्या. ज्यामुळे या उत्साहाला काही प्रमाणात गालबोट लागले.
पुण्यात विसर्जन मिरवणूक काल सकाळी ९:३० वाजता सुरू झाली. तब्बल ३० तासांहून अधिक काळ ही मिरवणूक सुरु होती. अलका टॉकीज चौकातून रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत २३२ मंडळे विसर्जनासाठी पुढे सरकली. तरीही ९ ते १० मंडळांचे विसर्जन बाकी होते. रात्री १२ वाजल्यानंतर डीजे बंद झाले असले तरी ढोल-ताशा पथकांनी उत्साह कायम ठेवला. पहाटे ६ वाजता डीजे पुन्हा सुरू झाल्यावर मिरवणुकीला पुन्हा वेग आला.
पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन ठरलेल्या वेळेत झाले. मात्र त्यानंतरच्या मंडळांना मोठी वाट पाहावी लागली. मानाचा पाचवा गणपती, केसरीवाडा गणपतीचे विसर्जन सायंकाळी ५:३९ वाजता झाले, तर दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन रात्री ९:२३ वाजता झाले. यावेळी शनिपार मंडळाने साकारलेला ३५ फूट उंच देवमासाचा देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मुंबईतील लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर समुद्रात अडकला आहे. यंदा नवीनच बनवण्यात आलेला तराफा आणि भरती या दोन कारणांनी लालबाग राजाच्या विसर्जनाला मोठा विलंब झाला आहे. यामुळे अनेक भाविका लालबाग राजाचं विसर्जन कधी होणार याकडे डोळे लावून बसले आहेत.
मुंबई पोलिसांनी विसर्जनासाठी २१,००० हून अधिक कर्मचारी तैनात होते. तसेच यावेळी एआय आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यंदा वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील ८४ रस्ते बंद ठेवण्यात आले होते. मुंबईतील साकीनाका परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान हाय टेन्शन वायरचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. तसेच महाराष्ट्रात विसर्जनादरम्यान चार जण बुडाल्याची आणि १३ जण बेपत्ता झाल्याचीही माहिती समोर आली आहे.