
मुंबईतून एक धक्कदायक घटनेची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या वरळी कोस्टल पुलावरुन एक आर्टिका कारचा भीषण अपघात झाला आणि ती थेट समुद्रातच घुसली. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पुलाचं रेलिंग तोडून थेट 30 फूट खाली कोसळली आणि समुद्राच्या पाण्यात पडली. सोमवारी रात्री हा दुर्दैवी अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांच्या पछकाने धाव घेत कारचालकाला पाण्यातून बाहेर काढले आणि त्याचे प्राण वाचवले. तो किरकोळ जखमी झाला आहे, पोलिसांनी त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. मात्र कोस्टल रोड पुलावरील या भीषण अपघातामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. 30 फूट खाली कोसळलेली कार, अजून समुद्राच्या तळाशी, पाण्यातच आहे असं समजतं.
नेमकं काय झालं ?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. वरळी वरून बांद्राला जाणाऱ्या कोस्टल ब्रिजवर ही दुर्घटना घडली. प्रकुशल बत्तीवाला (वय 28 वर्ष) हा तरूण आर्टिगा कार चालवत होता. तो चालक महालक्ष्मीहून वरळीच्या दिशेने वेगाने गाडी चालवत जात होता, मात्र कोस्टल पुलाजवळ आल्यावर एके ठिकाणी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट डिव्हायडरला धडकली आणि पुलाचा कठडा तोडून धाडकन समुद्राच्या पाण्यात खाली कोसळली.
या घटनेची माहिती महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना (MSF) मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रेस्क्यू ऑपरेशन राबवत कारचालाकला पाण्यातून बाहेर काढले. पाण्यात खोलात जाऊन सुरक्षा जवानांनी चालकाला रस्सीच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. समुद्रात पडलेली कार अजून तळाशीच असून त्याचा एक दरवाजा तुटला आणि तो पाण्यावर तरंगताना आढळला असे पोलिसांनी सांगितले. जखमी युवकावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत स्थानिक वरळी पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत.