
आगामी मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे तयारीला लागले आहेत. त्यातच मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समिती स्थापन केली होती. या समितीत काही प्रमुख नेत्यांना वगळण्यात आले होते. मात्र आता महापालिका निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीमध्ये सुरुवातीला वगळण्यात आलेल्या प्रमुख नेत्यांना आता स्थान देण्यात आले आहे. या यादीत आता माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप, खासदार चंद्रकांत हंडोरे आणि माजी आमदार नसीम खान यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसमधील संभाव्य अंतर्गत वाद टळल्याचे दिसत आहे.
काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने निवडणूक व्यवस्थापन व समन्वयासाठी ३४ जणांची समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, या समितीमध्ये भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान या प्रमुख मुंबईतील नेत्यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे याच तीन नेत्यांनी वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता, या तिन्ही नेत्यांना नव्या १२ जणांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले असून पक्षाने एकोपा साधण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीत पहिल्या ३४ जणांच्या यादीत माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप, खासदार चंद्रकांत हंडोरे आणि माजी आमदार नसीम खान यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे मुंबई काँग्रेसमधील संभाव्य अंतर्गत वाद टळल्याचे दिसत आहे.
दरम्यान मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना सोमवार ३० जून रोजी राजधानी दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार, माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे असे पाच मोठे नेते दिल्लीत दाखल झाले होते.
या बैठकीत मुंबई महानगरपालिका तसेच महाराष्ट्रातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सखोल चर्चा झाली. काँग्रेसने यंदाचे वर्ष ‘संघटन पर्व’ म्हणून घोषित केले आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात पक्ष संघटना मजबूत करण्यावर विशेष भर दिला जात आहे. या बैठकीत अनेक नेत्यांवर पक्षातील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याबाबतही चर्चा झाल्याची शक्यता आहे. एकंदरीत, समितीमधील नव्या समावेशामुळे मुंबई काँग्रेसमधील मतभेद दूर झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याची चिन्हे आहेत. तर दिल्लीतील बैठकीमुळे आगामी काळातील महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसच्या रणनीतीला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.