Pawanraje Nimbalkar Case : निकाल बाजूने लागावा म्हणून शिंदे गटात..राजकारण चुलीत गेलं, पवनराजेंच्या स्वीय सहायकाची संतप्त प्रतिक्रिया

Pawanraje Nimbalkar Case : कोर्टाने आज निकाल देताना मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील आणि अन्य आठ जणांची निर्दोष सुटका केली. माफीचा साक्षीदार विश्वासू नाही. त्यामुळे त्याच्या जबाबाच्या आधारावर आम्हाला आरोपींना शिक्षा देता येणार नाही असं कोर्टाने म्हटलं.

Pawanraje Nimbalkar Case : निकाल बाजूने लागावा म्हणून शिंदे गटात..राजकारण चुलीत गेलं, पवनराजेंच्या स्वीय सहायकाची संतप्त प्रतिक्रिया
Pawanraje Nimbalkar
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 20, 2026 | 1:50 PM

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात तब्बल 20 वर्षांनी आज विशेष सीबीआय कोर्टाने निकाल दिला. या निकालाकडे धाराशिवकरांसह अख्ख्या महाराष्ट्राच लक्ष लागलं होतं. 3 जून 2006 रोजी मुंबईहून धाराशिवला निघालेल्या पवनराजेंची आणि त्यांच्या ड्रायव्हरची नवी मुंबई कळंबोली येये गाडी अडवून निर्घुण हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या. आधी नवी मुंबई पोलिसांनी या केसचा तपास केला. पण तपासात प्रगती होत नसल्याने पवनराजेंच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या आदेशाने ही केस सीबीआयकडे गेली. त्यानंतर पहिल्यांदाच या खटल्यात माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांना मुख्य आरोपी बनवण्यात आलं. त्यांना अटक झाली होती. पण काही महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.

कोर्टाने आज निकाल देताना मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील आणि अन्य आठ जणांची निर्दोष सुटका केली. माफीचा साक्षीदार विश्वासू नाही. त्यामुळे त्याच्या जबाबाच्या आधारावर आम्हाला आरोपींना शिक्षा देता येणार नाही असं कोर्टाने म्हटलं. हा निकाल म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांना मानणाऱ्या धाराशिवकरांसाठी मोठा झटका आहे. “आमचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडाला. आमची मानसिकता राहिली नाही. 20 वर्षानंतर निकाल येतो. वेगळा येतो. खूप वाईट निकाल आला आहे. राजेसाहेबांची हत्या झाली नाही असाच निकाल आहे. खूप वाईट आहे. आम्ही खूप अपेक्षेने आलो होतो. आमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे” अशी प्रतिक्रिया निकालानंतर पवनराजे यांचे स्वीय सहायक रवी कोरे यांनी दिली.

आम्ही हार मानणार नाही

“माफीच्या साक्षीरादावर निकाल ग्राह्य धरत नाही तर कशावर ग्राह्य धरता? सर्वच निकाल खोडून टाका. मग पुरावे कशाला घेता, तसाच निकाल द्या” अशी संतप्त प्रतिक्रिया रवी कोरे यांनी दिली. “निकाल बाजूने लागावा म्हणून शिंदे गटात जात आहेत. हा चुकीचा आरोप आहे. या निकालाचा आणि पक्ष प्रवेशाचा काहीच संबंध नाही. चुकीचं आहे. विरोधक का म्हणत आहेत हे त्यांनाच माहीत. आमचं लक्ष राजे साहेबांच्या निकालाकडे होतं. आम्ही झोपलो नाही. १०० टक्के बाजूने निकाल लागेल ही अपेक्षा होती. आम्ही हार मानणार नाही. आम्ही लढणार. ओमराजे हार मानणार नाही. राजकारण चुलीत गेलं. आम्हाला निकाल महत्त्वाचा आहे” असं रवी कोरे म्हणाले.

Follow Us