Weather Update : दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घ्या, सोबत पाणी ठेवा, मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट, कोकणासाठी इशारा काय?
मुंबईसह महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट कायम असून, नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मान्सूनला विलंब झाल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे परिसरात उष्णतेची लाटसदृश स्थिती कायम राहील असा इशारा दिला आहे. दमट हवामानामुळे मुंबईकर घामाघूम होत असून, नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उन्हाच्या तडाख्यांनी राज्यातील नागरिक त्रस्त झाले असून पाऊस कधी येतो, याची सगळे चातकासारखी वाट बघत आहेत. मात्र मान्सूनचा अजूनही काही पत्ता नसून पावसासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यातील नागरिकांना तर उन्हाचा त्रास सहन करावा लागतच आहे, पण मुंबईकर फक्त ऊन नव्हे तर दमट हवामानामुळे घामाच्या धारांनीही त्रस्त झाले आहेत. याच दरम्यान हवामान विभागाने एक मोठा इशारा दिला आहे, त्यामुळे मुंबईकरांची चिंता आणखीनच वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि ठाण्यात आजही तीव्र उष्णतेची लाट कायम असेल. तसेच पुढील काही दिवस उष्णता कायम राहणार असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच उत्तर कोकणात उकाड्याचा तडाखाही वाढला असून त्यामुळे नागरिक अतिशय हैराण झालेत. मुंबई, ठाणे, रायगड परिसरात उष्णतेची लाटसदृश्य स्थिती असेल.
मुंबईत वाढलं तापमान, कुठे कशी स्थिती ?
सध्या मुंबईत तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. कुलाबा येथे तापमान 35.2 अंश तर सांताक्रूझमध्ये 35.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तसेच भायखळा येथे 37.8 अंश, राम मंदिर इथे 38.7 अंश तापमानाची नोंद झाली. एवढंच नव्हे तर विक्रोळी, वरळी, चेंबूर भागातही तापमान 36 अंशांच्या पुढे नोंदवण्यात आलं आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घरातू बाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे. तसेच भरपूर पाणी प्या आणि उष्माघात टाळण्यासाठी सतर्क रहा, असाही सल्ला देण्यात आला आहे.
सकाळी जरा गार वाटत असलं तरी दिवस चढत जातो तसा उन्हाचा तडाख्यामुळे जीव नकोस होतोय. उष्ण वाऱ्यांमुळे उकाड्यात वाढ झाली आहे, तर मान्सूनपूर्व पावसाला विलंब झाल्याने नागरिकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मान्सूनचं आगमन लांबणीवर
खरंतर दरवर्षी 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. परंतु यावेळी 26 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रात रेंगाळले, त्यामुळे हा अंदाज चुकला.
आता मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. मान्सून येण्यास उशीर होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार केरळमध्ये मान्सून येण्यासाठी 2 ते 4 जूनची वाट पाहावी लागू शकते. महाराष्ट्रामध्ये 8 ते 10 जूनच्या दरम्यान मान्सून दाखल होऊ शकतो, अशी शक्यता हवमाना खात्याने वर्तवली आहे.