
Manoj Jarange Patil Mumbai Protest : मुंबईत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण चालू आहे. काहीही झालं तरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेणार अशी भूमिका घेऊन जरांगे आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. जरांगे यांच्या या आंदोलनालामुळे संपूर्ण मुंबईचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. याच कारणामुळे जरांगेंच्या आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका दाखल करणाऱ्यांत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचाही समावेश आहे. दरम्यान, या सुनावणीदरम्यान पूर्ण ताकदीने युक्तिवाद केला जात आहे. पण युक्तिवाद सुरु असतानाच न्यायाधीशांनी संताप व्यक्त केलाय. नियमांचे उल्लंघन होत असल्याने न्यायमूर्तींनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना राज्याचे महाधिवक्ते विरेंद्र सराफ यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आले. 5000 आंदोलकांची मर्यादाही ओलांडण्यात आली. 30 आणि 31 ऑगस्ट रोजी जरांगे यांच्या आंदोलनाला सरकारने परवानगी दिली नव्हती, अशी मोठी माहिती महाधिवक्त्यांनी दिली आहे. तर दुसरीकडे जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील आमरण उपोषणाची परवानगी नाही तरीदेखील ते चालू आहे. सामान्यांना त्रास दिला जात आहे, असा युक्तिवाद केला आहे. दरम्यान हा सर्व युक्तिवाद चालू असताना न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.
सध्या न्यायालयात जरांगे यांच्या आंदोलनावर युक्तिवाद चालू आहे. आंदोलनाला विरोध करणारे याचिकाकर्ते मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत आहेत. हा युक्तिवाद चालू असताना न्यायालयाच्या परिसरात मराठा आंदोलक जमले आहेत. सुनावणीदरम्यान या आंदोलकांचे वकीलही न्यायालयात उपस्थित आहेत. युक्तिवाद चालू असतानाच आंदोलकाच्या वकिलाने बोलण्याचा प्रयत्न केला. हस्तक्षेप अर्ज दाखल न करता हा बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच वेळी न्यायालयाने यावर आक्षेप व्यक्त केला. आंदोलकाच्या वकिलाला न्यायालयाने थांबावले. तसेच संताप व्यक्त करत हस्तक्षेप अर्ज दाखल न करता कसे बोलू शकता? असा प्रश्न उपस्थित केला. न्यायालयाच्या या भूमिकेनंतर आंदोलकांचे वकील शांत झाले असून न्यायालय नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.