
कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेचा मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान मोठा अपघात झाला. एका लोकलमधून खाली पडल्याने 8 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला. यावेळी काही प्रवाशी जखमी झाले. या जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंब्रा आणि दिवा अपघातानंतर मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व लोकल गाड्यांना ऑटोमॅटिक बंद होणारे दरवाजे बसवण्यात येणार आहेत. तसेच 238 एसी लोकल मुंबई सबर्बनसाठी घेतल्या आहेत. ज्या गाड्या घेतल्या आहेत, त्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टिमने येणार आहेत. मध्य रेल्वेच्या या निर्णयावर राज ठाकरेंनी टीका केली.
राज ठाकरे यांनी नुकतंच पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंब्रा दिवा लोकल दुर्घटनेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी बाहेरून येणाऱ्या लोकांच्या वाढत्या लोंढ्यांना मुंबईतील रेल्वे आणि वाहतूक व्यवस्थेच्या बोजवार्याला जबाबदार धरले आहे. तसेच जर लोकलला दरवाजे बसवले तर लोक आत गुदमरून मरतील, असेही राज ठाकरे म्हणाले.
आपल्याकडे बाहेरून येणारे लोंढे आहेत यामुळेच रेल्वे कोलमडली आहे. रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, ट्राफिकचा बोजवारा उडालेला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाहीत. वाहनांसाठी रस्ते नाहीत. कोण येतंय, कोण जातंय तुम्हाला माहिती नाही. फक्त मेट्रो आणि बाकीच्या ज्या काही सोयी-सुविधा करत आहेत याने प्रश्न सुटणार नाही. मुंबईत मेट्रो, मोनो सर्व आहे. पण गाड्यांचे रजिस्ट्रेशन थांबलंय का? टू व्हीलर, फोर व्हिलरचे रजिस्ट्रेशन थांबलंय का, त्या गाड्या येतात आहेत. नक्की मेट्रो कोण वापरतंय, मोनो कोण वापरतंय, कोणी पाहायला तयार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
केंद्र सरकारने याकडे लक्ष द्यायला हवं. लोकलमध्ये प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही रोजची गर्दी पाहिली तर लोक आत कसे शिरतात, बाहेर कसे पडतात. मीही रेल्वेने प्रवास केलाय, त्यामुळे मला रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरील गर्दी माहिती आहे. तेव्हा गर्दी खूप कमी असायची. पण आता जर तुम्ही संध्याकाळी रेल्वेचा प्लॅटफॉर्म एकदा पाहा, तुम्ही त्यात आत शिरुन दाखवा. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा कशासाठी द्यावा, तिकडे जावं, त्यांनी बघावं. नसेल तर सुधारणा करावी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली.
एकदा मुंबई लोकलमधून प्रवास करुन बघा, जर लोकलला दरवाजे बसवले तर लोक आत गुदमरुन मरतील. किती गर्दी असते त्याची तुम्हाला कल्पना आहे का, त्याची एक जागा बाहेर येण्यासाठी हवी आणि एक जागा आत येण्यासाठी हवी. माणसाची आपल्या देशात किंमतच नाही. हीच घटना जर परदेशात घडली असती, तर ते कसे बघतात. जे मंत्री परदेशात जातात, ते काय घेऊन येतात”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.