
मुंबईतरांची लाईफलाईन म्हटली जाणारी लोकलसेवा आज दुसऱ्या दिवशीही सुरळीत सुरू नाहीये. मेगाब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ही खोळंबलेली आहे. तसेच पश्चिम रेल्वेची वाहतूक उशीराने सुरू आहे. कोणार्क पुलावर गर्डर घेण्यासाठी जो ब्लॉक घेण्यात आला होता, तो अद्याप रद्द करण्यात आलेल नाही. आज पहाटे 5.30 पर्यंत हा ब्लॉक घेण्यात आलेला होता, मात्र गर्डर बसवण्याचं काम पूर्ण न झाल्याने तिनही रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत असून रेल्वेसेवा उशिराने सुरू आहेत. मध्य रेल्वे मार्गावरून सीएसएमटीपर्यंत जाणाऱ्या काही लोकल परळपर्यंतच सुरू आहेत. एकंदरच रेल्वेच्या तिन्ही मार्गांची सेवा खोळंबलेली असून त्यामुळे प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामावर निघालेल्या लोकांना अथवा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनासाठी जाणाऱ्या शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना इच्छित ठिकाणी पोहोचायला उशीर होत आहे. रेल्वेच्या खोळंब्यामुळे रविवार असूनही अनेक गाड्यांमध्ये मोठी गर्दी दिसत आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल आणखी वाढले असून त्यांच्या मनस्तापात भर पडली आहे. दादर स्टेशन परिसरात लोकल ट्रेनच्या रांगा लागल्याने चाकरमान्यांची कामावर जाण्यासाठी कसरत सुरू आहे. अनेक जण लोकलमधून उतरून रेल्वे ट्रॅक वरून चालत स्थानक गाठत असल्याचे चित्र दिसत आहे.
हार्बर लोकल सेवेवर परिणाम
ब्लॉकमुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. हार्बर मार्गावरील कोणार्क ब्रिजचे काम सुरू असल्याने आज हार्बर मार्गावर पहाटे रेल्वे खोळंबली.दरम्यान या कामाबाबत प्रवाशांना कुठलीही पूर्व कल्पना न दिल्याने आज प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी कार्यालयात शासकीय कर्मचारी व अन्य कार्यालयीन कर्मचाऱ्यांना वेळेवर पोहचणे अश्यक्य झाले.सकाळी 5 वाजून 06 मिनिटांनी निघणारी रेल्वे 6 वाजता जीटीबी रेल्वे स्थानकात पोहचली. मात्र जीटीबी ते वडाला दरम्यान वारंवार सिग्नल मिळाल्याने 6 वाजून 06 मिनिटांनी वडाळ्याला पोहोचणारी रेल्वे तब्बल 50 मिनिटे उशिरा म्हणजे 6 वाजून 56 मिनिटे उशिरा वडाळारेल्वे स्थानकात पोहचली. वडाळा रेल्वे स्थानकावर हार्बर मार्गावरील सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व गाड्या वडा ळा पर्यंत चालविण्यात येतील अश्या सूचना रेल्वे कडून दिल्या गेल्या. 5 वाजून 30 मिनिटांनी हार्बर मार्गावर कोणार्क ब्रिजचे काम सुरू करण्यात आले आहे ते काम अजूनही पूर्ण न झाल्याने वाहतूक वडाळा पर्यंतच सुरू राहील या सूचने नंतर आधीच उशिरा झालेल्या रेल्वे प्रवाश्यांना ध्वजारोहणासाठी कार्यालयात कसे पोहचायचे याची चिंता सतावू लागली.दरम्यान प्रवाश्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.
पश्चिम रेल्वे सेवाही उशीराने
तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवाही उशीराने सुरू आहे. चर्चगेटसाठी गाडी नसल्याने अंधेरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणारी ट्रेन अंधेरी रेल्वे स्थानकापर्यंतच धावत आहे. आज सकाळपासून मेगाब्लॉकमुळे चर्चगेटकडे जाणाऱ्या सर्व गाड्या अंधेरीपर्यंत धावत आहेत. अंधेरी स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असून प्रवासी चिंतेत आहे. गर्डर बसवण्याचं काम पूर्ण न झाल्याने तिनीही रेल्वेच्या मार्गावर रेल्वे उशिराने धावत आहेत.