तुम मराठी लोग गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो… घाटकोपरमध्ये गुजरात्यांकडून मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक

घाटकोपरमधील एका सोसायटीत मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबाला "तुम मराठी लोग गंदा है" असे म्हटल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या घटनेचा निषेध केला असून, सोसायटीतील सदस्यांना समज दिली आहे. हा प्रकार मुंबईतील मराठी विरुद्ध अमराठी वाद पुन्हा एकदा चर्चेत आणतो.

तुम मराठी लोग गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो... घाटकोपरमध्ये गुजरात्यांकडून मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक
घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक ?
Image Credit source: social media
| Updated on: Apr 17, 2025 | 11:16 AM

स्वप्नांचं शहर असलेल्या मुंबईत विविध जातीचे, धर्माचे लोकं येतात आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने इथे मेहनत करून राहतात. कोणी काय खावं-प्यावं हा खरंतर ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत खाण्या-पिण्याच्या मुद्यावरून वाद होताना दिसत असून महाराष्ट्राचा, मुंबईचा सख्खा पुत्र असलेल्या मराठी माणसांनाच अपमानास्पद वागणूक मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये परप्रांतीय कुटुंबांनी बाहेरुन गुंड आणून मराठी कुटुंबाला मारहाण केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मराठी माणसांना मुंबईत चुकीची वागणूक दिल्याच्या अनेक घटना समोर आल्या असून घाटकोपरमध्ये याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे.

घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मांसाहार करतात म्हणून गुजराती कुटुंबाकडून मराठी कुटुंबातील लोकांचा अपमान केला असा मनसेचा आरोप आहे. मनसे पदाधिकाऱ्याने यासंदर्भातील पोस्ट केली असून त्यामुळे मुंबईत पुन्हा मराठी विरुद्ध अमराठी हा वाद शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. यामुळे नवा गदारोळ माजण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधील एका सोसायटीत हा प्रकार घडला. तेथे मराठी वि. अमराठी हा वाद चांगलाच पेटला आहे. तेथील एका गुजराती, मारवाडी आणि जैनबहुल सोसायटीमध्ये राहणाऱ्या आणि मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचे उघड झाले आहे. शाह नावाच्या व्यक्तीने या संबंधित मराठी कुटुंबाला बरंच सुनावलं. ‘तुम मराठी लोग गंदा है. तुम मच्छी मटण खाते हो’ असे त्याने मराठ कुटुंबाला सुनावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मात्र हा प्रकार समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी तेथे धाव घेतली आणि सोसायटीतील सदस्यांना चांगलीच समज दिली. मनसेचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांनी सोसायटीत शिरून तेथील संबंधित गुजराती आणि जैन रहिवाशांना या घटनेचा जाब विचारत त्यांना खडसावलं. मात्र मराठी कुटुंबाला त्रास देणारी शाह नावाची व्यक्ती समोर आलीच नाही. तर सोसायटीतील इतर रहिवाशांनी मात्र सारवासारव केली. आम्ही मराठी विरुद्ध अमराठी भेदभाव करत नाही, आम्ही मांसाहार खाण्यावर कोणतेही बंधन आणत नाही, असे ते म्हणताना दिसले.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी “मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असे काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा ही गुजराती आहे. मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. इथे अनेक भाषा बोलल्या जातात,” असे वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यातच आता त्याच घाटचकोपरमध्ये मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने हा वाद आणखीनच पेटण्याची चिन्हे आहेत.

काय आहे राजेश पार्टे यांची पोस्ट ?

या घटनेसंदर्भात मनसेचे राजेश पार्टे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत व्हिडीओ देखील शेअर केला. घाटकोपरच्या सोसायटीमध्ये ते संबंधित नागरिकांना समज देताना दिसले. राजेश पार्टे यांची पोस्ट जशीच्या तशी…

ह्या घाटकोपर मधे आम्ही मराठी माणसासाठी रोज रोज किती भांडायचं, तुम मराठी लोग गंदा है. तुम मच्छी मटण खाते हो. पुर्ण सोसायटी गुजराती फक्त ४ जण मराठी. रोजचा ह्यांचा ञास मराठी माणसाला खालच्या दर्जाची भाषा वापरून रोजचा आपमान. आज घुसलो कायते ऐकदा होऊनच जाऊदे. सगळ्यांची .. फाटली.