
मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, राजकीय पक्षांच्या सभा सुरू असून, आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना पहायला मिळत आहे. आज ठाण्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची संयुक्त प्रचार सभा सुरू आहे, या सभेत बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी यावेळी निशाण साधला. अण्णा मलाई यांनी मुंबई महाराष्ट्राची नाही अशा अर्थाचं विधान केलं होतं, त्याचा देखील राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात चांगलाच समाचार घेतला.
छगन भुजबळांना तुरुंगात टाकणारे हेच फडणवीस. त्यांना काय झालं माहीत नाही? बरा होता माणूस, आता आतापर्यंत बरा होता. ती रसमलाई आली होती, तो सांगतोय मुंबई आणि महाराष्ट्राचा संबंध नाही आणि फडणवीस म्हणतात तो असा बोलला नाही. त्याचा तो अर्थच होत नाही, मला वाटतं फडणवीसांना इंग्रजी कळतं, असा टोला यावेळी राज ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला. पण खोटं बोलत राहायचं, यांना वाटतं खोट्याचं खरं करता येतं, नाही होणार आता. तो बोलतोय मुंबई महाराष्ट्राची नाही. फडणवीस म्हणतात तो असं बोललाच नाही. त्याचा अर्थ तसा होत नाही. किती खोटं बोलायचं काही मर्यादा आहे का नाही? कुणासाठी करत आहात? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी यावेळी केला.
दरम्यान काल अदानीचं प्रकरण काढलं. काय मिर्च्या झोंबल्या. माझा आणि अदानीचा फोटो दाखवला, बरं मग पुढे. माझ्या घरी अदानी येऊन गेले. रतन टाटा येऊन गेले. अंबानी येऊन गेले. घरी येऊन गेले म्हणून त्यांची पापं झाकायची का मी? मी काल जे दाखवलं ते इतकं भयानक आहे, इतके भीषण आहे, ते दोन चार वर्षापूर्वीचा फोटो दाखवत आहेत. आता घरी आल्यावर काय त्यांना हाकलून देऊ. जेव्हा महाराष्ट्रावर मुंबई, ठाण्यावर संकट येईल तेव्हा राज ठाकरे दोस्ती बिस्ती बघणार नाही. अदानीशी दोस्ती करण्याचा तर विषयच नाही. मी इतका अडाणी नाही. काल जे सांगितलं त्याचं गांभीर्य समजून घ्या, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.