गुड न्यूज! मुंबईतील लोकलमधील गर्दी कमी होणार; अखेर 15 डब्यांची लोकल धावणार, नवं वेळापत्रक जाणून घ्या
mumbai local train : मुंबईत मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावर आता बदलपूर-कर्जतपर्यंत 15 डब्यांची ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेकडून तब्बल 7 वर्षांनी 15 डब्ब्यांच्या लोकल वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाने अंबरनाथ, बदलापूर, कर्जतच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेकडून ही अंमलबजावणी 20 जुलैपासून करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयाने लोकलमधील गर्दी कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेतील लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना दररोज गर्दीचा सामना करावा लागत आहे. लोकल ट्रेनमधील गर्दीतून पडून अनेक प्रवाशांच्या मृत्यूच्या दुर्देवी घटना घडल्या आहेत. या वाढत्या गर्दीवर उपाय काढण्यासाठी अनेक रेल्वे प्रवासी संघटना मागण्या करत होत्या. अंबरनाथ, बदलापूर, कर्जत परिसरातील प्रवाशांकडून अनेक वर्षांपासून 15 डब्यांची ट्रेन सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर अखेर मध्य रेल्वेने कल्याणच्या पुढे 15 डब्यांची लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता 20 जुलैपासून मुख्य मार्गावरील 12 डब्यांच्या 10 लोकल 15 डब्यांच्या रेकमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतलाय.
मध्य रेल्वे मार्गावर तब्बल ७ वर्षांनी १५ डबा लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आलीये. या बदलामुळे प्रत्येक लोकलची प्रवासी क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढणार आहे. तसेच लोकलमधील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मार्गावर 16 ऑक्टोबर 2012 रोजी प्रथमच 15 डब्यांच्या 16 लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 4 मार्च 2019 साली आणखी 6 सेवा सुरू झाल्या. त्यामुळे ही संख्या 22 वर पोहोचली होती. आता 20 जुलैपासून आणखी 10 सेवा 15 डब्यांच्या करण्यात येत आहे. त्यामुळे मध्ये रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल सेवांची एकूण संख्या 32 होणार आहे.
10 लोकल सेवांमध्ये सीएसएमटी – अंबरनाथ, सीएसएमटी – कल्याण, सीएसएमटी – बदलापूर आणि सीएसएमटी – कर्जत या परतीच्या प्रवासातील लोकलचा समावेश करण्यात आलाय. परंतु मध्य रेल्वेच्या एकूण उपनगरीय फेऱ्यांची संख्या १,८२० इतकीच कायम राहणार आहे. भविष्यात-कसारा मार्गावरील 15 डब्यांच्या लोकल सेवे करण्याचा मानस आहे.
मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक
मध्ये रेल्वेने आज रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे विद्याविहार ते ठाणेदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर आज सकाळी ८ ते दुपारी १.३० दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या ब्लॉक कालावधित विद्याविहार ठाणेदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील रेल्वेगाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील, असं सांगण्यात आलं आहे.