मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर कार थांबवली तर खिसा रिकामी होणार, कारवाईचा धडाका सुरु

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर वाहने थांबवून फोटो आणि रिल्स काढणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली असून ५०० रुपये दंड आकारला जात आहे.

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर कार थांबवली तर खिसा रिकामी होणार, कारवाईचा धडाका सुरु
mumbai pune missing link
| Updated on: May 04, 2026 | 7:40 AM

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्प नुकताच वाहतुकीसाठी खुला झाला आहे. हा नवीन महामार्ग सुरु होऊन ४८ तास उलटत नाही तोवर आता महामार्ग पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर वाहने थांबवून फोटो आणि रिल्स बनवणाऱ्या पर्यटकांवर आता कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून बोगद्यात आणि पुलावर गाड्या उभ्या करणाऱ्या १५ वाहनचालकांवर शनिवारी महामार्ग पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

गिनीज बुकमधील विक्रमाची भुरळ

मुंबई ते पुणे दरम्यान खोपोली ते कुसगाव दरम्यानची १३.३ किमीची मार्गिका आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार मानली जात आहे. यातील दोन बोगदे जगातील सर्वात रुंद बोगदे ठरले आहेत. त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. तसेच, येथील केबल स्टेड पूल देशातील सर्वात उंच पूल आहे. निसर्गरम्य परिसर आणि या भव्य रचनेमुळे अनेक वाहनचालक बोगद्यात किंवा पुलावर गाड्या थांबवून सेल्फी, फोटो आणि रिल्स काढताना दिसत आहेत. आता याच पार्श्वभूमीवर मिसिंग लिंकवर वाहने थांबवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

५०० रुपयांचा दंड आणि कायदेशीर कारवाई

महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मार्ग प्रवेश नियंत्रित असून येथे वाहनांची वेगमर्यादा ताशी ८० ते १०० किमी आहे. अशा वेगवान मार्गावर वाहने थांबवणे हे केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन नसून अपघातांना निमंत्रण देणारे आहे. मोटार वाहन कायद्यातील कलम १२२ आणि १७७ अंतर्गत चुकीच्या पद्धतीने पार्किंग आणि अडथळा निर्माण करण्यामुळे कारवाई केली जात आहे. यात दोषी आढळणाऱ्या वाहनचालकांकडून ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.

पर्यटनस्थळ नाही, महामार्ग आहे!

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) स्पष्ट केले आहे की, मिसिंग लिंक हा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. हे एक वाहतुकीचे साधन आहे, पर्यटनस्थळ नाही. प्रवाशांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी कोठेही वाहने थांबवू नयेत, असे आवाहन एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी राहुल वसईकर यांनी केले आहे.

हा प्रकल्प पूर्ण होण्यास झालेला चार वर्षांचा विलंब झाला आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. सुरुवातीला या प्रकल्पासाठी ६,६९५ कोटी रुपये अपेक्षित होता. मात्र आता हा खर्च ७,१८० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरत आहे.

Follow Us