रोहित आर्याने आधीच सर्व प्लॅन केला, मुलांना ओलीस ठेवण्यापूर्वी 10 मिनिटे आधी पालकांना एक मेसेज केला अन्.., धक्कादायक माहिती

रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं मुंबईतील एका स्टुडिओमध्ये काही मुलांना ओलीस ठेवल्याची घटना घडली होती, पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला, आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.

रोहित आर्याने आधीच सर्व प्लॅन केला, मुलांना ओलीस ठेवण्यापूर्वी 10 मिनिटे आधी पालकांना एक मेसेज केला अन्.., धक्कादायक माहिती
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 31, 2025 | 8:58 AM

मुंबईमध्ये गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली, या घटनेनं राज्यभरात चांगलीच खळबळ उडाली, रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीनं मुंबईच्या पवई येथील आरए स्टुडिओमध्ये काही मुलांना ओलीस ठेवलं होतं. मुलांची सुटका करण्याच्या प्रेयत्नात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्याचा एन्काउंटर झाला, दरम्यान आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवण्यापूर्वी या मुलांच्या सर्व पालकांना एक मेसेज पाठवला होता, ज्यामध्ये त्याने म्हटलं होतं की, आज शूटिंगला वेळ लागणार आहे, त्यामुळे मुलांना दहा मिनिटं भेटून घ्या. त्यानंतर आर्याने हॉलचे दरवाजे बंद करून मुलांना ओलीस ठेवले आणि काही वेळातच स्वतःचा व्हिडिओ जारी केला. मुलांना वाचवण्यासाठी तब्बल दीड ते पावणेदोन तास पोलीस त्याच्याशी फोनवर बोलून, त्याची समजूनत काढत होते. मात्र यामध्ये काही पोलिसांना यश आलं नाही.

त्यानंतर पोलिसांनी आर्याला फोनवर बोलण्यात गुंतवून, स्टुडिओच्या दुसऱ्या बाजुने शिडीचा वापर करून टॉयलेटच्या खिडकीतून स्टुडिओमध्ये प्रवेश केला. पवई पोलीस ठाण्याचे एटीसी सेलचे एपीआय अमोल वाघमारे साध्या वेषात खिडकीतून आत गेले. वाघमारे यांना बघताच रोहित आर्या हा बॅगमधून शस्त्र काढण्याच्या तयारीत होता, त्याचवेळी त्यांनी  रोहित आर्यावर गोळी झाडली, या घटनेत त्याचा मृत्यू झाला.

आर्याने एकूण 17  मुलं, दोन महिला आणि एका पुरुषाला ओलीस ठेवलं होतं, रोहित आर्याच्या तावडीतून सर्वांची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. रोहित आर्याने या सर्व मुलांना ऑडिशनसाठी मुंबईतील आरए स्टुडिओमध्ये बोलावलं होतं. एकूण 100 मुलं ऑडिशनसाठी आले होते, त्यातील 80 मुलांना त्याने परत पाठवलं, तर उर्वरीत मुलांना ओलीस ठेवलं, ज्या मुलांना ओलीस ठेवलं होतं, ती मुलं राज्यातील वेगवेगळ्या भागांमधून ऑडिशनसाठी मुंबईमध्ये आली होती. रोहित आर्या हा मुळ पुण्याचा राहणारा आहे, मात्र तो गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच राहत होता अशी माहिती समोर आली आहे.  पाच दिवसांपासून तिथे ऑडिशन सुरू होतं, त्यानंतर अचानक सहाव्या दिवशी रोहित आर्यानं हे पाऊल उचललं, शेवटी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.