Mumbai Rains : अतिमुसळधार पावसाचा तडाखा! मुंबईसाठी पुढचे 5 दिवस धोक्याचे, तातडीचा हवामान अंदाज समोर!
मुंबई, उपगरांसाठी हवामान विभागाने पावसाचा नवा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, पनवेल या भागात चांगला पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Mumbai Rains Update : राज्यात ठिकठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, मुंबई तसेच उपनगरात तुफान पाऊस चालू आहे. मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. दरम्यान, सध्याची स्थिती लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्यांना महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे 4 तास महत्त्वाचे असणार आहेत.
कल्याण डोंबिवलीत तुफान पाऊस
पावसामुळे डोंबिवली एमआयडीसीत आंब्याचे मोठे झाड कोसळले आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. एमआयडीसी परिसरातील एम्स हॉस्पिटल रोडवरील बंगल्याच्या आवारात ही घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. तरीदेखील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबरनाथच्या राज्य महामार्गावर पाणी साचलं आहे. विमको नाक्याजवळ रस्ता जलमय झाला आहे. तासाभराच्या पावसात रस्त्यावर हे पाणी साचलं आहे.
दोन कॉलेज विद्यार्थिनींना विजेचा धक्का
नवी मुंबईत सायन पनवेल हायवेवर जुईनगर याठिकाणी जलमय झाला आहे. मुबंईकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली आहे. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एल.पी. ब्रिजखाली बिकानेरसमोर वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची घटना घडली असून त्यातून विद्युतप्रवाह पसरल्याने दोन कॉलेज विद्यार्थिनी करंटच्या संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दोघीही पाण्यात पडल्या असून त्यांना तातडीने डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नेरूळ पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला
महापे–शिळफाटा मुख्य रस्ता जलमय झाला आहे. साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. साचलेल्या पाण्यातून वाहनचालक वाहन काढत आहेत. दुसरीकडे रस्त्यावर पाणी साचल्याने बदलापूर कटाई रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
पावसाचा अंदाज काय?
दरम्यान, मुंबई, उपगरांसाठी हवामान विभागाने पावसाचा नवा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, पनवेल या भागात चांगला पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी पाच दिवस मुंबई, मुंबई उपगर तसेच कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.