Rain Updates : जाएं तो जाएं कैसे?… रेल्वेचा खोळंबा अन् वाहतुकीची कोंडी, मुंबई-ठाण्याला पावसाने झोडपून काढताच चाकरमान्यांची तंतरली
मुंबईत संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्य रेल्वेसह तिन्ही मार्गावरील लोकल १०-१५ मिनिटे उशिराने धावत आहेत. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले असून वाहतूक मंदावली आहे. ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अनेक दिवसांपासून नागरिक ज्याची आतुरतेने वाट बघत होते, त्या पावसाचे अखेर आगमन झाले असून अविरत कोसळणाऱ्या पावसाने आता मुंबईला झोडपून काढलं आहे. मुंबईतील अनेक भागात गेल्यादोन दिवसांपासून सतत पाऊस कोसळत असून जराही विश्रांती घेतलेली नाही. पावसाच्या धारांनी नागरिक जरी सुखावले असले तरी सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी साचायला सुरूवात झाली आहे. तसेच या पावाचा मुंबईच्या लाईफलाइनला म्हणजे लोकल सेवेलाही फटका बसला असून अनेक गाड्या उशीराने धावत आहेत.
पावसाच्या संताधारेचा परिणाम मुंबईतील रेल्वे गाड्या वरती झाल्या तर पाहायला मिळतंय. मध्य रेल्वेवरील वाहतूक 10-15 मिनिट उशिराने सुरु आहे. तर ट्रान्स हार्बर लोकल देखील 10-15 मिनिट उशिराने सुरु आहेत. एवढंच नव्हे तर पश्चिम लोकल मार्गावर अप आणि डाऊन दिशेने १० ते १४ मिनिट उशिराने धावत आहेत . यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी झाली असून ऑफीसला, कामावर वा कॉलेजमध्ये निघालेल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
तर सकाळ पासून पडणाऱ्या पावसाचा ठाण्यातील वाहतुकीवर परिणाम झाला असून ठाण्यातील इस्टर्न एक्सपर्स वे वर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मुसळधार पावसामुळे वाहनांची दृश्यमानता कमी होत असल्याने वाहतुकीवर परिणाम झालाय. ठाणे शहरात काल रात्री पासून मुसळधार पाऊस पडत असून सकाळी कामाला जाणाऱ्या नागरिकांना पावसाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आज दिवसभर पावसाचा जोर कायम असणार असून मुंबई ठाणे पालघर सह इतर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर पहिल्याच पावसामध्ये मुंबई गोवा महामार्गाची दैना उडाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर कोलेटी नजीक महामार्गावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. एकीकडे मुसळधार पाऊस त्यात खड्ड्यांचे विघ्न यामुळे चालक मात्र त्रस्त झाले आहेत.
चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे सखल भागात पाणी साचल. हिंदमाता परिसरही पाण्याने भरून गेला आहे. दरम्यान मुंबईला पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात देखील चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे मुंबईवर ओढवलेलं पाणीसंकट कमी होण्यास मदत होणार. रात्रीपासून सुरू असलेला मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबईत मुसळधार, किती कुठे पाऊस?
सांताक्रूझ 165.9
जुहू विमानतळ 164.5
विक्रोळी 163.0
राम मंदिर स्टेशन 157.0
बांद्रा 141.5
विद्याविहार 132.0
सायन 115.0
चेंबूर 99.5
कुलाबा 99.0
भायखळा 97.5
पावसाची नोंद
मंबई शहर 134 मिमी
मुंबई पूर्व उपनगरे १६४ मिमी
मुंबई पश्चिम उपनगरे १४९ मिमी
कल्याण-डोंबिवलीत पावसाची संततधार कायम;
कल्याण-डोंबिवलीत पावसाची संततधार कायम असून मध्यरात्रीनंतर दिलासा मिळाला तरी सकाळी पुन्हा पासाने झोडपायला सुरूवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कल्याण-डोंबिवलीत जनजीवन विस्कळीत केले. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग आणि रस्त्यांवर पाणी साचले होते. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. मात्र आजही शहरात ढगाळ वातावरण असून जोरात पाऊस सुरूच आहे . अधूनमधून पावसाचा जोर वाढत असून पावसाचा जोर दिवसभर कायम राहिला तर आज पुन्हा सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे