Sanjay Raut : मुंबईकरांच्या भावनांशी खेळ, INS विक्रांतच्या नावाखाली 57 कोटी रुपये घशात घातले, राऊतांचा सोमय्यांवर आरोप

| Updated on: Apr 06, 2022 | 10:15 AM

किरीट सोमय्या यांनी सुरु केलेल्या या मोहिमेला लाखो मुंबईकरांनी प्रतिसाद दिला. यातून 57 कोटी रुपये तेव्हा जमा झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर ही रक्कम राजभवनात जमा करू, असं किरीट सोमय्या म्हणाले होते. मात्र प्रत्यक्षात ही रक्कम राज्य सरकारकडे देण्यात आलेली नाही. वीरेंद्र उपाध्याय या माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागितलेल्या माहितीवरून नुकतचं हे प्रकरण उघडकीस आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

Sanjay Raut : मुंबईकरांच्या भावनांशी खेळ, INS विक्रांतच्या नावाखाली 57 कोटी रुपये घशात घातले, राऊतांचा सोमय्यांवर आरोप
संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांवर आरोप
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई | भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी देशद्रोहासारखा गुन्हा केल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मालमत्तेवर ईडीने काल टाच आणल्यानंतर भाजप आणि शिवसेनेतील वाद आणखीच चिघळत चालला असून राऊत यांनी आज किरीट सोमय्या यांचा आणखी एक घोटाळा आज बाहेर काढला. 2013-14 आणि 2014-15 साली देशाच्या संरक्षण दलाचा अभिमान असलेली आयएनएस विक्रांत(INS Vikrant) भंगारात काढण्याची तयारी सुरु होती. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी भाजपाचा झेंडा घेऊन सेव्ह विक्रांत नावाने मोहिम सुरु केली. लाखो-करोडो मुंबईकरांकडून कोट्यवधी रुपये जमा केले. मात्र या रकमेचे पुढे काय झाले? आयएनएस विक्रांत तर भंगारात गेली. त्यावेळी 57 कोटी रुपये अशी ही रक्कम सांगण्यात आली होती. प्रत्यक्षात 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम किरीट सोमय्या यांनी स्वतःच्या घशात घातली, हा देशद्रोहाचा गुन्हा आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. या गुन्ह्याची चौकशी का केली जाऊ नये, असा सवालही राऊत यांनी केला.

संजय राऊत यांचा आरोप काय?

संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले, ‘ 2013-14, 2014-15 संरक्षण दलाची अभिमान असलेली आयएनएस विक्रांत स्क्रॅपमध्ये काढण्यासाठी तयारी सुरु झाली होती. मात्र आयएनएस विक्रांतमध्ये संरक्षण खात्यात एक म्युझियम बनावं यासाठी देशभरात आंदोलन सुरु झालं. मुंबईच्या समुद्रात ही बोट होती. त्या काळी या कामासाठी 200 कोटी रुपये लागतील, असं सागण्यात आलं होतं. दिल्लीत संरक्षण मंत्र्यांना भेटण्यासाठी सर्व पक्षांचे खासदार आले होते. शिवसेनेचे राहुल शेवाळे, शिवाजीराव पाटी, श्रीरंग बारणे होते. आम्ही सगळेच त्यात होतो. सध्या भ्रष्टाचाराविरोधात लढणारे भाजपाचे महात्मा किरीट सोमय्यादेखील होते. पण ते पैसे काही जमा होऊ शकले नाहीत. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी अशी एक मूव्हमेंट सुरु केली की सरकारला जर 200 कोटी रुपये देणं होत नसेल तर ते पैसे आम्ही गोळा करू आणि सरकारला देऊ. त्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी ही पैसे गोळा करण्याची मोहिम सुरु केली.

लाखो-करोडो लोकांनी दिलेले पैसे कुठे गेले?

त्या काळी किरीट सोमय्या यांनी सुरु केलेल्या या मोहिमेला लाखो मुंबईकरांनी प्रतिसाद दिला. यातून 57 कोटी रुपये तेव्हा जमा झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर ही रक्कम राजभवनात जमा करू, असं किरीट सोमय्या म्हणाले होते. मात्र प्रत्यक्षात ही रक्कम राज्य सरकारकडे देण्यात आलेली नाही. वीरेंद्र उपाध्याय या माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागितलेल्या माहितीवरून नुकतचं हे प्रकरण उघडकीस आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच या कार्यकर्त्याला राज्यपालांनी दिलेल्या पत्रात स्पष्ट म्हटलंय की अशा प्रकारची रक्कम राज्य शासनाकडे आलेली नाही, मग ही रक्कम किरीट सोमय्या यांनी स्वतःच्या घशात घातली आहे. निवडणुकीवर आणि स्वतःच्या मुलाच्या कंपनीवर त्यांनी ही रक्कम खर्च केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. लाखो-करोडो मुंबईकरांच्या भावनेशी हा खेळ असून हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

इतर बातम्या-

Success Story: कोरडवाहू जमिनीवर सफरचंदचा गोडवा, आधुनिकतेची कास धरत ठाकरे शेतकऱ्यानं साधली ‘ही’ किमया

राऊतांनी टाइमपास न करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरावे द्यावे; आयएनएस विक्रांतप्रकरणी सोमय्यांचे आव्हान