MNS : मनसेचं पुन्हा खळखट्ट्याक? मोर्चाला परवानगी नाकारली, वातावरण तापलं, प्रचंड संख्येने पोलीस रस्त्यावर; मीरा-भाईंदरची अपडेट काय?

मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. त्यावर मनसेनेही मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला, पण पोलिसांनी परवानगी नाकारून मनसे नेत्यांची अटक केली. यामुळे मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत आणि मीरा-भाईंदरमधील वातावरण तणावपूर्ण आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मराठी-अमराठी मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

MNS : मनसेचं पुन्हा खळखट्ट्याक? मोर्चाला परवानगी नाकारली, वातावरण तापलं, प्रचंड संख्येने पोलीस रस्त्यावर; मीरा-भाईंदरची अपडेट काय?
मनसे कार्यकर्ते आणि सामान्य लोकांचाी धरपकड
| Updated on: Jul 08, 2025 | 10:51 AM

मुंबईत पुन्हा एकदा मराठी-अमराठीचा मुद्दा जोरदार तापला आहे. मीरा भाईंदरमध्ये एका अमराठी व्यापाऱ्याच्या कानशिलात लगावल्यानंतर व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून मीरा भाईंदर बंद पुकारला. मात्र, मनसेनेही उत्तर म्हणून मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला. पण पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. एवढंच नव्हे तर पोलिसांनी मनसे नेत्यांची मध्यरात्री धरपकड करून त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे मनसे कार्यकर्ते आणि सामान्य लोक संतापले असून रस्त्यावर उतरले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा खळखट्ट्याक मोडवर जात असल्याचं चिन्ह दिसत आहे. तर दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून आंदोलनकर्त्यांना अडवलं जात आहे. त्यामुळे मीरा भाईंदरमधील वातावरण चांगलंच तापलं आहे.

मराठी माणसालाच विरोध का ?

मराठीच्या मुद्यासाठी जमलेल्या लोकांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या अनेक महिलांनांही ताब्यात घेण्यात आलं असून पोलिस त्यांना जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवत आहे.  व्यापाऱ्यांच्या मोर्चावेळी कायदा का नाही ? अमराठी लोकांच्या मोर्चाला परवानगी दिली मग आम्हाला का नाही ? सरकारची मराठी माणसावरच कारवाई का ? असे अनेक सवाल येथे जमलेल्या लोकांकडून उपस्थित केले जात आहेत. मराठी एकजुटीचा विजय असो,  महाराष्ट्र सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या जात असून वातावरण पूर्णपणे तापलेलं आहे.

या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?

महाराष्ट्रात राहूनही मराठी माणसावरच अन्याय होत आहे. पोलिसांनी पूर्णपणे दडपशाही केली आहे, मला असं वाटतंय की मी गुजरातमध्ये येऊन मोर्चा काढतोय. अरे मराठी माणसाने महाराष्ट्रात नाही तर गुजरातमध्ये जाऊन मोर्चा काढायचा का ? या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ? पोलिसांनी धरपकड केलेल्या मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी, आंदोलकांनी आणि सामान्य लोकांनी हा प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

आम्ही सामान्य व्यक्ती आहोत. आम्ही कोणत्याही जाती-धर्माविरोधात बोलत नाहीयोत, कोणाबद्दलही आम्हाला आक्षेप नाही, पण मग फक्त मराठीलाच विरोध का असा सवाल एका महिलेने विचारला. जेव्हा गुजराती, मारवाडी लोक रस्त्यावर उतरले, जय गुजरात म्हणाले तेव्हा सर्व बहिरे झाले होते का असा रोखठोक सवालही त्यांनी उपस्थित केला.

ही कसली लोकशाही ?

”मी मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी बोलले म्हणून माझी धरपकड मुंबई पोलिस करत आहे. ही कसली लोकशाही?” असा सवाल पोलिसांनी पकडलेल्या एका महिलेने केला आहे. मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांसह अनेक सर्वसामान्य लोकही माय मराठीसाठी रस्त्यावर उतरले आहेत.  अनेक महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख पोलिसांच्या ताब्यात

मिरा रोड प्रकरणी  मनसेचे नेते संदीप देशपांडे 11 वाजता राज ठाकरेंची शिवतीर्थ येथे भेट घेणार आहेत.  आणि या विषयावर चर्चा करतील. मिरा रोड पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी मिरा रोड येथे पोहोचत आहेत.

दरम्यानमराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख हे आंदोलन स्थळी पोहोचण्या अगोदरच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.