गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, कोकणात जाणाऱ्या स्पेशल ट्रेन्स जाहीर, कधीपासून सुरु होणार बुकींग?

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मध्य आणि पश्चिम रेल्वेने मुंबई, पुणे आणि इतर शहरांतून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी अनेक विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. २४ जुलैपासून आयआरसीटीसी आणि रेल्वे आरक्षण केंद्रांवर या गाड्यांचे आरक्षण सुरू होईल. या गाड्या रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव आणि चिपळूणसारख्या प्रमुख ठिकाणी पोहोचतील.

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, कोकणात जाणाऱ्या स्पेशल ट्रेन्स जाहीर, कधीपासून सुरु होणार बुकींग?
ganpati festival 2025
| Updated on: Jul 20, 2025 | 12:04 PM

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळआला आहे. मध्य रेल्वेने मुंबई आणि पुण्याहून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वेगाड्यांची सोय केली आहे. रेल्वे प्रशासनाने सुमारे २५० विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची योजना आखली आहे. ज्यामुळे बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर होणार आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण २४ जुलैपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी लवकरात लवकर बुकींग करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेने यंदाच्या गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. या गाड्यांमुळे मुंबई, पुणे आणि गुजरातसह विविध भागांतून येणाऱ्या गणेशभक्तांचा कोकणातील प्रवास आणखी सोयीचा होणार आहे. येत्या २४ जुलैपासून विशेष गाड्यांसाठी आरक्षण सुरू होईल. अनारक्षित डब्यांसाठी तिकीट आरक्षण (UTS) अतिजलद मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कानुसार करता येईल. मध्य रेल्वेकडून गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. या रेल्वे गाड्या कोकण रेल्वेमार्गे धावणार आहेत. या गाड्या मुंबई, पुणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव आणि चिपळूण या प्रमुख स्थानकांपर्यंत धावतील. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन या गाड्यांची सोय करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या प्रमुख विशेष गाड्या

  • ०११५१/५२ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी – मुंबई (रोज): मुंबईहून सावंतवाडीसाठी दररोज सेवा.
  • ०११५३/५४ मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी – मुंबई (रोज): मुंबईहून रत्नागिरीसाठी दररोज सेवा.
  • ०११६७/६८ लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी – मुंबई (दैनिक): लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान दररोज.
  • ०११७१/७२ लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी – मुंबई (दैनिक): लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान दररोज.
  • ०११८५/८६ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – मुंबई (साप्ताहिक): लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान साप्ताहिक सेवा.
  • ०११६५/६६ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – मुंबई (साप्ताहिक): लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान साप्ताहिक सेवा.
  • ०१४४७/४८ पुणे – रत्नागिरी – पुणे (साप्ताहिक): पुण्याहून रत्नागिरीसाठी साप्ताहिक सेवा.
  • ०१४४५/४६ पुणे – रत्नागिरी – पुणे (साप्ताहिक): पुण्याहून रत्नागिरीसाठी साप्ताहिक सेवा.
  • ०११०३/०४ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी – मुंबई (दैनिक): मुंबईहून सावंतवाडीसाठी दररोज सेवा.
  • ०११२९/३० लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी – मुंबई (साप्ताहिक): लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान साप्ताहिक सेवा.
  • ०११५५/५६ – दिवा – चिपळूण – दिवा (रोज): दिवा ते चिपळूण दरम्यान दररोज सेवा.

पश्चिम रेल्वेच्या प्रमुख विशेष गाड्या

पश्चिम रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी ५ विशेष रेल्वे फेऱ्या जाहीर केल्या आहेत. या गाड्या देखील गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन चालवण्यात येणार आहेत.

  • ०९०११/१२ मुंबई सेंट्रल ते ठोकर (साप्ताहिक): मुंबई सेंट्रल ते ठोकर दरम्यान साप्ताहिक सेवा.
  • ०९०१९/२० मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी (आठवड्यातून चार दिवस): मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी दरम्यान आठवड्यातून चार दिवस सेवा.
  • ०९०१५/१६ वांद्रे ते रत्नागिरी (साप्ताहिक): वांद्रे ते रत्नागिरी दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी.
  • ०९११४/१३ बडोदा ते रत्नागिरी (साप्ताहिक): बडोदा ते रत्नागिरी दरम्यान साप्ताहिक सेवा.
  • ०९११०/०९ विश्वामित्रा ते रत्नागिरी (साप्ताहिक): विश्वामित्रा ते रत्नागिरी दरम्यान साप्ताहिक सेवा.

बाप्पाच्या विसर्जनासाठी पालिकेची जय्यत तयारी

त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेने (BMC) मोठ्या उत्साहात बाप्पााच्या विसर्जनाचीही तयारी केली आहे. यंदा मूर्तींच्या विसर्जनासाठी मुंबईत तब्बल २५० कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. यामुळे सार्वजनिक आणि घरगुती दोन्ही प्रकारच्या गणेशमूर्तींचे विसर्जन सोयीस्करपणे करता येणार आहे. विशेष म्हणजे, विसर्जन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा देखील उपलब्ध केली जाईल. यामुळे भाविकांना ठरलेल्या वेळेत आपल्या बाप्पाचे विसर्जन करता येईल आणि गर्दी टाळता येईल.

मुंबईत सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि सव्वा लाख घरगुती गणेशोत्सव साजरे होतात. या मूर्तींचे विसर्जन पालिकांनी बनवलेले कृत्रिम तलाव किंवा समुद्र व इतर नैसर्गिक जलस्थळांवर केले जाते. यंदा पीओपी (Plaster of Paris) मूर्तींवर समुद्रात किंवा नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जन करण्यास बंदी असल्यामुळे, महानगरपालिकेने कृत्रिम तलावांची संख्या लक्षणीय वाढवली आहे. विसर्जनस्थळी भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पालिकेचे सुमारे २५ हजारहून अधिक कर्मचारी तैनात राहणार आहेत. हे कर्मचारी विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यास मदत करतील आणि भाविकांना मार्गदर्शन करतील.