कॅन्सरमुळे नातवाने रस्त्यात सोडून दिलेल्या आजीचा अखेर दुर्दैवी शेवट

मुंबईत नातवाने कर्करोगग्रस्त आजीला रस्त्यावर सोडल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली होती. उपचारासाठी भाईंदर येथील आश्रमात दाखल केलेल्या ७० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नातवाच्या या क्रौर्याने संपूर्ण समाजात संताप व्यक्त होत आहे.

कॅन्सरमुळे नातवाने रस्त्यात सोडून दिलेल्या आजीचा अखेर दुर्दैवी शेवट
Image Credit source: social media
| Updated on: Oct 17, 2025 | 12:20 PM

आजी-आजोबांसाठी नातवंड म्हणजे दुधावरची साय असतात, मुलांपेक्षा जास्त प्रेम ते नातवंडांवर करतात, त्यांच्याशी घोडा-घोडाही खेळतात, वरण-भात भरवतात, प्रसंगी आई-वडिलांच्या रागापासूनही संरक्षण करतात. एवढं निर्व्याज, निर्मळ प्रेम क्वचितच दिसतं. पण याच प्रेमाला काळं फासणारी एक लज्जास्पद घटना काही दिवसांपूर्वी मुंबईत घडली होती. तिथे एका नातवाने त्याच्या आजीला रस्त्यावर सोडून दिलं होतं, कचऱ्यात फेकल्याचा धक्कादायत प्रकार उघडकीस आला होता. कॅन्सर झाल्यामुळे नातवानेच आजीला बेवारस अवस्थेत सोडून पळ काढला होता. आता याच सदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्या वयोवृद्ध महिलेचा दुर्दैवी शेवट झाला असून त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

यशोदा गायकवाड (वय 70 ) असे त्या महिलेचे नाव असून भाईंदर जवळ असलेल्या उत्तन गावातील एका आश्रमात त्या उपचार घेत होत्या. कर्करोगामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.

नातवाला जमेना आजीचा सांभाळ, रस्त्यात टाकून काढला पळ

मिळालेल्या माहितीनुसीार, जून महिन्यात गोरेगावच्या आरे येथील दर्गा रस्त्यावरील निर्जन भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक वयोवृद्ध महिला सापडली होती. 21 जूनला ही घटना उघडकीस आली. सकाळी 8 च्या सुमारास काही नागरिकांना
कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एक वृद्ध महिला दिसली. त्यानतंर या घटनेची माहिती आरे पोलिसांना मिळाली असता त्यांनी घटनास्थळ गाठून महिलेची विचारपूस केली व त्यांना कूपर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. बोलता बोलता असं समजलं की त्या महिलेला त्वचेचा कर्करोग झाला आहे. माझ्या नातवाने मला इथे आणून सोडले असे त्या महिलेने पोलिसांना सांगितले होते

संबंधित महिला ही तिच्या नातवासोबत रहायची. मात्र तिला त्वचेचा कर्करोग झाल्याने नातवाला तिला सांभाळं, तिची देखभाल करणं शक्य होत नव्हतं. अखेर त्याने जून महिन्यात आजीला रस्त्यावरच कचऱ्याच्या ढिगाजवळ सोडून दिलं. यामुळे बऱ्याच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या . त्यानंतर त्या नातवाचा शोधही घेण्यात आला होता. आजी आजारी होती व तिचं वयंही झाल्याने आपणच तिला रस्त्यात सोडून दिलं, अशी कबुली त्या नातवाने दिली होती. त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याचेही समोर आले होते.

त्यानंतर संबंधित वृद्ध महिला भाईंदर जवळ असलेल्या उत्तन गावातील एका आश्रमात राहून तेथे उपचार घेत होती. मात्र तिथेच तिने अखेरचा श्वास घेतला. यामुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.