
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांनी चांगलीच कंबर कसली आहे. गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक प्रक्रियेत गोंधळ आणि घोळ होत असल्याचा आरोप सातत्याने काँग्रेस नेते राहुल गांधी करत आहेत. तर आज 14 ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाच्या (Opposition Leader Delegation Visit to State Election Commission) अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे, जितेंद्र आव्हाडांसह विरोधकांनी आयोगाच्या कारभारावर बोट ठेवले. तर घोळावर थेट निशाणा साधला. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी काय दिली माहिती?
निवडणुकीतील गोंधळ थांबवा
चोक्कलिंगम हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत. त्यांना राज्यातील मतदार यादीतील घोळ दाखवण्यासाठी विरोधी पक्ष आले होते. आम्ही निवडणूक अधिकाऱ्याला त्रुटी दाखवून दिल्या. राज ठाकरेंनी अनेक उदाहरण दाखवली. आम्ही पुरावे दिले. निवडणूक यादीत मोठा गोंधळ आहे. हे दिसतंय. हीच यादी १ जुलै रोजी फ्रिज करून या यादीवर निवडणुका घेतल्या तर तोच गोंधळ सुरू राहील. आम्ही आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र यावं आणि आमच्या शंकांचं निरसन कराव, असा आग्रह केला. तेव्हा उद्या चोक्कलिंगम आणि निवडणूक आयुक्त आमचं म्हणणं ऐकणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिली.
मतदार यादीतील घोळावर निशाणा
राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेण्यापूर्वी याद्या दुरुस्त केल्या पाहिजे. ११७ वर्षाचं वय असणाऱ्या माणसाला ४० वर्षाचा मुलगा हे लॉजिकमध्ये बसत नाही. घराचे नाव नाही. पत्ते नाही, एकाच घरात अनेक लोक राहताना दिसत आहे, असा निशाणा जयंत पाटील यांनी धरला. या याद्या दुरुस्त व्हाव्यात, चुकीच्या पद्धतीने टाकलेली नावं वगळण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सर्व नेते उद्या सोबत
याद्या दुरुस्त करा ही मागणी आहे. त्यात घोळ आहे. दोष आहे. त्रुटी आहे. आमचे माजी आमदार अशोक पवार यांना तर निवडणूक आयोगाने उत्तर दिलंय की, मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची माहिती गोपनीय आहे. ती व्यक्तीगत आहे. ही माहिती इतरत्र प्रसिद्ध होऊ नये म्हणून ही माहिती देण्यात येणार नाही. शिरूरच्या निवडणूक अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. आमचं म्हणणं निवडणूक आयुक्त आणि चोक्कलिंगम ऐकणार आहेत. उद्या पुन्हा ११ वाजता बैठक होणार आहे. उद्या पुन्हा सर्व नेते एकत्रित असतील. व्हीव्हीपॅट लावलं पाहिजे ही मागणी आहे. त्यांनी नकार दिला. त्यावरही उद्या चर्चा होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे सर्व राज्यात आहे. कुठे प्रायव्हसी भंग होते. काही ठिकाणी तर बुथ कॅप्चरिंगही झाले. मी कोणत्याही मतदारसंघाचं नाव घेणार नाही. उद्या चर्चा करू. उद्याच पत्रकार परिषद होईल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
निवडणुका पारदर्शक होण्यासाठीचा प्रयत्न
केरळ, बंगाल, कर्नाटकात भाजप हीच मागणी करत आहे. त्याच मागणीसाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो आहोत. म्हणून भाजपने आमच्यासोबत राहावं असं आमचं म्हणणं आहे. हे राजकीय शिष्टमंडळ नाही. देशातील निवडणुका पारदर्शक व्हाव्यात असं आमचं म्हणणं आहे, अशी भूमिका संजय राऊत यांनी स्पष्ट केली.
चोक्कलिंगम यांच्यासोबत काही निर्णय अनिर्णित आहे. त्यामुळे उद्या बैठक होणार आहे. चोक्कलिंगम आणि राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे बैठकीला असतील. त्यामुळे उद्या चर्चा होईल. चर्चा अपुरी झाली आहे. पुन्हा उद्या चर्चा होणार आहे. उद्या १२ वाजता वेळ कळवली जाईल, असे राऊतांनी स्पष्ट केले.