
मुंबईच्या ‘लाइफलाइन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन शनिवारी संध्याकाळी एका कुटुंबासाठी ‘डेथलाइन’ बनली. मालाड रेल्वे स्टेशनवर किरकोळ वाद टोकाला पोहोचला आणि मोठा हल्ला झाला. चालत्या ट्रेनच्या दरवाज्याजवळ एका अज्ञात हल्लेखोराने ३३ वर्षीय प्राध्यापक आलोक कुमार सिंह यांच्या पोटात चाकू भोसकला. ट्रेन थांबण्याआधीच अंधाराचा फायदा घेऊन मारेकर पळून गेला. आता नेमकं काय घडलं होतं चला जाणून घेऊया…
हल्लेखोराने अचानक चाकू भोसकला
समोर आलेल्या माहितीनुसार, प्राध्यापक आलोक कुमार सिंह हे एका खासगी महाविद्यालयात शिकवत होते. शनिवारी संध्याकाळी ते घरी परतत होते. प्रवासादरम्यान एका गोष्टीवरून सहप्रवासी सोबत त्यांचा वाद झाला. सूत्रांच्या मते, हल्लेखोराने वादात ‘पाहून घेईन’ अशी धमकी दिली होती. ट्रेन मालाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर येताच आलोक उतरण्यासाठी दरवाज्याजवळ आले, तेव्हा हल्लेखोराने अचानक पोटात चाकू भोसकला. प्रवासी काही समजण्याआधीच हल्लेखोर चालत्या ट्रेनमधून उडी मारून पळून गेला.
नेमकं काय घडलं?
आरोपी ओमकार शिंदेने आलोक सिंग यांच्यावर वार करण्यासाठी हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणारा चिमटा वापरला होता. आरोपी हा खेतवाडी परिसरात एका मेटलच्या कारखान्यात काम करतो. आरोपीने आलोक सिंग यांच्यावर वार केल्यानंतर शस्त्र म्हणून वापरलेला चिमटा फेकून दिलाय त्याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपी ओमकार शिंदे हा दररोज याच लोकलने मालाड ते चर्नी रोड असा प्रवास करतो. आलोक सिंग यांना पुढे सरकण्यासाठी आरोपी शिंदे ढकलत होता, पुढे महिला उभी असल्याने आलोक सिंग यांनी धक्का मारू नको अश्या सूचना केल्या. या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि उतरतानाच खिशात असलेल्या चिमट्याने आरोपीने आलोक सिंग यांच्या पोटात वार केला. सीसीटीव्हीतील दृश्यानुसार हा वार एकदाच करून आरोपी शिंदे पळून जाताना दिसत आहे. मात्र चिमटा टोकदार असल्याने आलोक यांना गंभीर इजा झाली आणि झालेल्या रक्तस्त्रावाने त्यांचा मृत्यू झाला आहे.
आरोपीला अटक
पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बोरीवली जीआरपीने भादंवि कलम १०३ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोराचा शोध सुरु होता. आता हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.