
मुंबई: नागपूर व मुंबईला (mumbai) जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग 701 किमीचा आहे. हा महामार्ग 24 जिल्ह्यातून जात असून तो 16 पॅकेजेसमध्ये विभागलेला आहे. त्यातील, वर्धा येथे पॅकेज- 2 आणि इगतपुरी येथे पॅकेज- 14 या दोन पॅकेजवर अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने (afcons infrastructure limited) काम केले आहे. पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिट (PQC) पूर्ण करणारी तसेच समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway Project) प्रकल्प कालावधी आधी पॅकेज 2 चे काम पूर्ण करणारी अॅफकॉन्स ही पहिली कंपंनी ठरली आहे. तसेच, पॅकेज-14 मध्ये इगतपुरी येथील दुहेरी बोगदे दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण केले आहेत. असंख्य आव्हाने आणि कोविड-19 साथीच्या आजारानंतर उद्भवलेल्या परिस्थितीतसुद्धा हे टप्पे गाठले. त्यामुळे अॅफकॉन्स लिमिटेडचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असून या महामार्गामुळे राज्याच्या विकासाला वेगाने चालना मिळणार आहे.
वर्धा येथील खडकी आमगाव ते पिंपळगाव या 58.4 किमी या पॅकेज 2 चे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या पट्ट्यात 10 दशलक्ष क्यूबिक मीटर ओपन टेकडी कटिंग, दोन वन्यजीव उन्नत मार्ग, एक रोटरी आणि दोन इंटरचेंज, 18 दशलक्ष क्यूबिक मीटर मातीकाम, छोटे आणि मोठे पूल आणि असंख्य स्टील स्ट्रक्चर्सची उभारणी या कामांचा समावेश पॅकेज दोन मध्ये आहे.
अॅफकॉन्स चे पॅकेज 2 चे प्रकल्प नियंत्रक कृष्णमूर्ती यांनी पॅकेज 2 मधील बांधकामे ही अभियांत्रिकी आव्हाने दर्शवित असल्याचे सांगितले. आम्हाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या चांगल्या पाठिंब्यामुळे कोविड महामारी असतानाही चांगले काम करता आले. कामाच्या अंमलबजावणीची गती वाढवता आली, असे कृष्णमूर्ती यांनी सांगितले.
आम्ही प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भू कामासाठी एक उत्कृष्ट टीम तयार केली होती. तसेच, भारतातील सर्वात मोठा वन्यजीव उन्नत मार्ग बांधला. बांधकामादरम्यान कोणत्याही प्राण्याला इजा होणार नाही याची आम्ही काळजी घेतली. कारण यामध्ये ड्रिलिंग आणि ब्लास्टिंगचा समावेश होता. आम्ही दोन्ही बाजू बॅरिकेड केल्या आणि सुरक्षिततेची योग्य खबरदारी घेतली, असे अॅफकॉन्स चे पॅकेज-2 चे प्रकल्प व्यवस्थापक अभिजीत चक्रवर्ती यांनी सांगितलं.