
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले. शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगवेगळी झाली. आता या गटातील आमदार, कार्यकर्ते त्या गटात जात आहेत. मग छगन भुजबळ परत शरद पवार यांच्याकडे जाणार का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ‘टीव्ही ९ मराठी’चा महाराष्ट्राचा महासंकल्प कार्यक्रमात विचारण्यात आला. यावेळी छगन भुजबळ यांनी होय, मी गेलो होतो ना, शरद पवार यांच्या निवासस्थानी. त्यावेळी त्यांची प्रकृती बरी नव्हती. दोन तास थांबलो होतो.आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. राजकारणात एकमेकांच्या विरोधात आहोत. राजकीय विरोधक समजतो. आरक्षणासाठी मी पवारांकडेही जाईल. मोदींकडेही जाईल, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या घरीही जाईल. यापुढे कोणी कुठे असेल पण कुणी चहाला बोलावलं तर मी जाईल. आरक्षणासाठी मी कोणाच्या दारात जाईल, असे मिश्कील उत्तर भुजबळ यांनी दिले.
विधानसभा निवडणुकीत तुम्ही अजित पवार यांच्यासोबत असणार का? या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, तुम्हाला अशी शंका का यावी. मी अजित पवार यांच्यासोबत असेल आणि महायुतीची साथ सोडणार नाही. राजकारणात शंका घेऊ नका. राजकारणात शंका घेणं चुकीचं आहे, असे भुजबळ यांनी म्हटले.
मी कुणाकडे काही मागत नाही. मी काय सांगितले. पलिकडचे लोक काय म्हणतात. ओबीसीतून आरक्षण द्या. मी काय म्हणतो, आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. कारण ३८४ जाती आहेत. तुम्ही आला तर कुणालाच काही मिळणार नाही. पवारांशी या विषयावरच चर्चा झाली. मंडल आयोग आल्यावर आम्ही पवारांकडे आरक्षण लागू करण्याची मागणी केली होती. त्यांनी एक दीड महिन्यात अंमलबाजवणी केली. त्यांना तेच सांगायला गेलो होतो. आरक्षणावर घाला येत आहे. तुम्ही सीनियर नेते आहात. तुम्ही सांगा. यात मराठ्यांना घ्यायचं का हे विचारण्यासाठी मी पवारांकडे गेलो. पवार, ठाकरे असो किंवा काँग्रेसने सांगावं, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं का, हे स्पष्ट करा.
मी शिवसेना आरक्षणाच्या मुद्द्यावर सोडली. आमचा बॅकलॉग भरला गेला नाही. मराठा समाजाला १० टक्के टिकणारं आरक्षण दिलं. त्या १० टक्क्यात फक्त मराठा आहे. ओबीसीत साडेतीनशे जाती आहेत. अध्यादेश काढलेला नाही. अधिसूचनाही काढली नाही. हे असे करावे का त्यावर लोकांच्या हरकती मागवल्या, साडे आठ लाख हरकती आल्या. असं करू नये म्हणून सांगितलं, असे भुजबळ यांनी सांगितले.