अमित शाहांना विचारल्याशिवाय राष्ट्रवादीचं विलिनीकरण नाहीच? दिल्लीतील बैठकीत काय ठरलं? इन्साईड स्टोरी समोर

अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या भेटीत विलिनीकरणाचा निर्णय त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय होणार नाही, असा शब्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला आहे.

अमित शाहांना विचारल्याशिवाय राष्ट्रवादीचं विलिनीकरण नाहीच? दिल्लीतील बैठकीत काय ठरलं? इन्साईड स्टोरी समोर
ncp leaders
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 03, 2026 | 3:32 PM

दिवंगत नेते अजितदादा पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा होत होती. अजितदादा यांच्या निधनानंतर या चर्चेने प्रचंड जोर धरला होता. अजूनही दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा दबक्या आवाजात होत असते. मात्र, त्या दिशेने कोणतंही पाऊल पुढे जाताना दिसत नाही. आता त्याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. अमित शाहा यांना विचारल्याशिवाय राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नसल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तसा शब्दच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्याचं समोर आलं आहे.

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. दिल्लीत ही भेट झाली होती. ही भेट दुष्काळी परिस्थितीवर चर्चा केल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं होतं. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होतं. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा झाली होती. यावेळी अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ ठेवण्याच्या सूचना राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्याचं समजतं.

Loading...

पवारांचा वाढता प्रभाव

विलिनीकरणाचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एनडीए सोबत घेण्याची वेळ आली तर तुमच्याशी चर्चा केल्याशिवाय आणि विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय होणार नाही, असा शब्दच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी अमित शाह यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्ष समोर येत असताना दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वाढता प्रभाव याबाबत देखील बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

पार्थ पवार यांची तक्रार

पार्थ पवार पक्षातील वरिष्ठ नेत्यांना डावलत आहेत. त्यांचा पक्षातील हस्तक्षेप वाढला आहे. तसेच पार्थ यांचा मनमानी कारभार वाढल्याची तक्रारही पक्षाच्या नेत्यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे. तर, पक्षातील अंतर्गत संघर्ष वाढवू देऊ नका. अंतर्गत संघर्ष वाढत राहिला तर पक्षात फूट पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे वरिष्ठांनी परिस्थिती हाताळली पाहिजे, अशा सूचना अमित शाह यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सुनेत्रा पवार, पार्थ पवार अंधारात?

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. राज्याच्या उपमुख्यमंत्री, पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना अंधारात ठेवून ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या दोन्ही नेत्यांच्या परस्पर या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतचा शब्द अमित शाहांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us