मुंबईतील कला दिग्दर्शकाच्या हत्येचं गूढ उकललं, मुख्य आरोपी ताब्यात

कला दिग्दर्शक क्रिशनेंदू चौधरी यांचा मृतदेह गेल्या शुक्रवारी विरारमधील खाडीत बेडशीटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यांच्या व्यावसायिक भागीदाराने आर्थिक वादातूनच ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे

मुंबईतील कला दिग्दर्शकाच्या हत्येचं गूढ उकललं, मुख्य आरोपी ताब्यात
फोटोमध्ये मयत कला दिग्दर्शक क्रिशनेंदू चौधरी
| Updated on: Aug 12, 2019 | 8:32 AM

नालासोपारा : मुंबईतील कला दिग्दर्शक क्रिशनेंदू चौधरी हत्या (Art Director Krishnendu Chowdhury) प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मालाडचा रहिवासी असलेला 38 वर्षीय मोहम्मद फुरकान याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मृत क्रिशनेंदू चौधरी यांचा तो व्यावसायिक भागीदार आहे. विरार आणि मालाडमधील मालवणी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत रविवारी रात्री आरोपीची धरपकड करण्यात आली.

क्रिशनेंदू चौधरी हे चित्रपट, मालिका, व्हीआयपी लग्न सोहळे यांच्या सेटचं डिझाईन तयार करत असत. त्यांच्या डिझाईन्सना  मुंबईत मोठी मागणी होती. चौधरी डिझाईन तयार करुन आरोपी मोहम्मद फुरकान याला देत असत. त्यानंतर फुरकान त्याचा सेट उभारत.

चौधरी यांचे काही पैसे आरोपी फुरकानकडे अडकले होते. या पैशावरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. सात ऑगस्ट रोजी या दोघांची एक मिटिंग झाली होती. याच मिटिंगच्या वेळी दोघांचा वाद विकोपाला गेला.

त्यावेळी आरोपी फुरकान आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी मिळून क्रिशनेंदू यांना मालाड पश्चिमेकडील आर्यलँड भागात नेलं. तिथे त्यांच्यावर धारदार चाकूने वार करण्यात आले. त्यांचा मृतदेह बेडशीटमध्ये बांधला आणि रात्री उशिरा एका कारमध्ये टाकून तो विरार खणीवडेमधील रेती बंदराच्या खाडीत फेकून दिला.

पसार झालेल्या दोघा साथीदारांचा शोध सुरु आहे. पुरावे नष्ट करणे आणि मृतदेहाची विल्हेवाट लावणे यासाठी मुख्य आरोपीला दोघांनी मदत केल्याचा आरोप आहे.

37 वर्षीय क्रिशनेंदू चौधरी हे मुंबईतील गोरेगाव भागात राहत होते. गेल्या बुधवारी (7 ऑगस्ट) रात्री आठ वाजल्यापासून त्यांच्याशी संपर्क न होऊ शकल्यामुळे त्यांच्या रुममेटने मालाडमधील मालवणी पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. मात्र शुक्रवारी (9 ऑगस्ट) त्यांचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत विरारमधील खाडीत आढळला.