आईप्रमाणे वडिलांचाही जीव घेतील, अश्विनी बिद्रेंच्या मुलीचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

| Updated on: Feb 18, 2020 | 8:00 AM

'माझ्या आईचा मृतदेह मला शोधून द्यावा. आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी. म्हणजेच माझे बाबा मला परत मिळतील' अशी भावनिक साद सिद्धी गोरेने घातली आहे.

आईप्रमाणे वडिलांचाही जीव घेतील, अश्विनी बिद्रेंच्या मुलीचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र
Follow us on

मुंबई : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या मृत्यूचं गूढ अद्याप उकललेलं नसतानाच त्यांच्या मुलीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. आईप्रमाणे माझ्या वडिलांनाही मारुन टाकतील, अशी भीती सिद्धी राजू गोरेने पत्रातून व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभारही तिने पत्रातून (Ashwini Bidre Daughter Letter to CM) मानले आहेत.

‘शिवशाहीचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना 19 फेब्रुवारीच्या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा’ अशी पत्राला सुरुवात सिद्धीने केली आहे. ‘माझ्या आईचा पोलिसांनीच खून केला आहे. मी वयाच्या सहाव्या वर्षापासून माझ्या आईचा मृतदेह मिळण्यासाठी आणि खुन्याला अट करण्यासाठी खूप वेळा मुंबईला आले आहे. पैसे नसल्यामुळे मृतदेह शोधला नाही’ असं तिने पत्रात पुढे लिहिलं आहे.

‘माझ्या बाबांबरोबर मी आईचा शोध घ्यावा, यासाठी त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर सकाळी 11 वाजल्यापासून रात्रीपर्यंत थांबले होते. ते दिवसभर कार्यालयात होते. आम्हाला भेटायला बोलावले होते, पण भेटले नाहीत. दिवसभर पिण्यासाठी पाणीही मिळाले नाही. संध्याकाळी परदेशी साहेब भेटले, त्यांनी मला खाण्यासाठी त्यांच्याकडील काजू आणि पाणी दिले’ असं सिद्धीने पत्रात नमूद केलं आहे.

‘बाबा म्हणतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटुया. म्हणून ते दिवस आठवतात आणि मनात भीती निर्माण होते’ असं सिद्धी म्हणते. ‘आपण पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना? आपण माझ्यासाठी वेळ द्याल ना? आमच्यावर झालेला अन्याय सांगण्यासाठी बोलायचे आहे, ऐकाल ना?’ असे निरागस प्रश्न तिने विचारले आहेत.

‘माझे बाबा मला परत मिळावेत, गेल्या चार वर्षांपासून ते मुंबईला कोर्टाकडे जातात. ते नेहमी रात्री निघतात, रात्री येतात. नेहमी बेचैन असतात. माझ्यासाठी वेळ कमी पडतो. बाबाला पोलिस लोकच मारतील असी मला भीती वाटते. बाबांना मी ओळखते, काही झाले तरी ते न्यायासाठी मागे हटणारे नाहीत. माझ्या बाबांचे काही बरेवाईट होईल, अशी भीती मला वाटते. या जगात माझे बाबाच माझं सर्वस्व आहेत’ असंही सिद्धी कारुण्याने लिहिते.

‘माझ्या आईचा मृतदेह मला शोधून द्यावा. आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी. म्हणजेच माझे बाबा मला परत मिळतील’ अशी भावनिक सादही पत्राच्या शेवटी (Ashwini Bidre Daughter Letter to CM) सिद्धीने घातली आहे.

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण काय?

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे उर्फ अश्विनी राजू गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून 15 एप्रिल 2016 पासून बेपत्ता झाल्या होत्या. अश्विनी बिद्रे गायब होण्यामागे वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांचा हात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. पोलीस सुरुवातीला या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप बिद्रे यांच्या कुटुंबियांनी केला होता. अखेर अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचं उघड झालं. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे करुन वाशीच्या खाडीत टाकण्यात आले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी कुरुंदकरसह चौघे जण तुरुंगात आहेत.

अश्विनी बिद्रे यांचा विवाह 2005 साली हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत झाला होता. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली याठिकाणी झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार येत होता. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं.

Ashwini Bidre Daughter Letter to CM