
मुंबई महापालिकांच्या निवडणुकीच्या निकालांनंतर महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. दादर-माहीम मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वाद विकोपाला गेले आहेत. या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. शिवसेना उमेदवार समाधान सरवणकर यांनी आपल्या पराभवासाठी भाजपला जबाबदार धरले आहे. भाजपच्या एका टोळीने पक्षाचा आदेश डावलून मला पाडण्यासाठी रीतसर मोहीम राबवली, असा खळबळजनक आरोप समाधान सरवणकर यांनी केला. आता यावर भाजपचे पदाधिकारी जितेंद्र राऊत यांनी प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे.
भाजपचे मुंबई सेक्रेटरी जितेंद्र राऊत यांनी नुकतंच फेसबुकवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी समाधान सरवणकर यांना खडे बोल सुनावले आहेत. भाजपची मते नसती तर चौथ्या क्रमांकावर असता, असे जितेंद्र राऊत यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच 191 192 194 भाजपा लढली असती तर नगरसेवक भाजपाचे असते, असेही त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे. जितेंद्र राऊत यांच्या या पोस्टमुळे महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. तसेच भाजपच्या पाठिंब्याशिवाय सरवणकरांची स्थिती काय असती, हे देखील त्यांनी याद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
माझ्या प्रभागात मला पाडण्यासाठी चार-पाच आमदार आणि दोन पक्षप्रमुखांची मुले तळ ठोकून होती. सर्वांचे मुख्य टार्गेट मीच होतो. मतदार माझ्यासोबत होते. पण भाजपच्या एका विशिष्ट पदाधिकाऱ्याने युतीधर्माला हरताळ फासला. भाजपच्या एका विशिष्ट पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना व्हॉट्सअँप मेसेज करून सरवणकरांना मदत करू नका असे स्पष्ट आदेश दिले होते. आपल्याला वरून काहीतरी आलेले आहे असे भासवून कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यात आली, असा आरोप समाधान सरवणकर यांनी केला.
भाजपचा अधिकृत लेबल असल्याने कार्यकर्त्यांनी त्या पदाधिकाऱ्याचे ऐकले. त्यामुळे आम्हाला मिळणारी मदत जाणीवपूर्वक रोखण्यात आली. हा प्रकार केवळ महापालिकेपूरता मर्यादित नसून लोकसभेपासून हे सर्व सुरु आहे. लोकसभेत शीतल गंभीर यांचा पराभव कसा होईल, यासाठी हीच भाजपची टोळी सक्रिय होती. तरीही गंभीर यांनी विजय मिळवला. त्यानंतर प्रिया सरवणकर यांनाही लक्ष्य करण्यात आले. ही विशिष्ट मंडळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याबद्दलही अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन बोलत होती. भाजप अशा पद्धतीने काम करेल याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. आपला पराभव हा जनतेने दिलेला कौल नसून स्थानिक पातळीवर झालेल्या गद्दारीचा परिणाम आहे. या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे घेऊन मी लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, असेही समाधान सरवणकर म्हणाले.
दरम्यान प्रभादेवी-वरळी हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. यंदाच्या निवडणुकीत वॉर्ड १९४ मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून समाधान सरवणकर यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. या वॉर्डमधून ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे विजयी झाले. यानंतर आता समाधान सरवणकरांनी हे गंभीर आरोप केले आहेत.